
सामना प्रतिनिधी । नाशिक
नाशिकच्या पंचवटीतील टकलेनगर येथे अनेक वर्षांपासून घरातच राहणाऱ्या पतीच्या मित्राने महिलेला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. यात महिला 90 टक्के भाजली असून, तिला पेटवून देणारा पतीचा मित्रही जखमी झाला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टकलेनगर येथे बाळू मोरे हे पत्नी रेखा (32), मुलगी सायली यांच्यासह राहतात. गेल्या तेरा वर्षांपासून बाळू यांचा मित्र रवींद्र नाना भामरे हा त्यांच्याच घरात राहत होता. रेखा ही रवींद्रला दुसरीकडे घर भाड्याने घेऊन राहण्यास जा, असे दोन महिन्यांपासून सांगत होती. याच रागातून रवींद्र याने मित्र बाळू घरात नसताना रविवारी सकाळी रेखा हिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. यावेळी त्याचे पायही भाजले गेले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेखा मोरे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात रवींद्र भामरे विरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































