हैदराबाद प्रकरणानंतर एक लाख 30 हजार महिलांनी ‘सुरक्षा’ ऍप केले डाऊनलोड

355

विविध राज्यांतील पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी लाँच केलेल्या ‘सुरक्षा’ ऍपचा हैदराबादेतील सामूहिक बलात्कार व हत्येच्या घटनेनंतर वापर वाढला आहे. एकटय़ा बंगळुरूत हैदराबादेच्या घटनेनंतर तब्बल एक लाख 30 हजार महिलांनी पोलिसांचे ‘सुरक्षा’ ऍप डाऊनलोड केल्याची माहिती पुढे आली आहे. या ऍपमुळे महिलांना अवघ्या सात सेकंदांत मदत मिळते, असा दावा पोलिसांनी केला आहे.

बंगळुरू पोलिसांनी 2017 साली हे सुरक्षा ऍप लाँच केले होते. तेव्हापासून आतापर्यंत 2 लाख 80 हजार महिलांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांत दोन पेट्रोलिंग व्हॅन तैनात असून ऍपवर घटनेची माहिती मिळताच या व्हॅनच्या माध्यमातून तत्काळ मदत पुरवली जाते. ऍपचा महिलांबरोबरच पुरुषांनाही वापर करता येतो, असे बंगळुरू पोलीस उपायुक्त कुलदीप जैन यांनी सांगितले. ऍप लाँच केले त्यावेळी इतका प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र हैदराबाद बलात्कार प्रकरण घडल्यापासून अधिकाधिक महिला हे ऍप डाऊनलोड करीत आहेत.

– गुगल प्ले स्टोअरवर महिलांच्या सुरक्षेसंबंधी दोनशेहून अधिक ऍप उपलब्ध आहेत, परंतु त्यातील केवळ 20 टक्के ऍप उपयोगी आहेत.
– गुगल प्ले स्टोअरवर महिला सुरक्षेसंबंधी दोन प्रकारचे ऍप आहेत. त्यातील एकामध्ये आपत्कालीन स्थितीची माहिती थेट पोलिसांना मिळते, तर दुसऱया ऍपद्वारे घरच्या मंडळींना माहिती मिळते.

इतर काही राज्ये व तेथील सुरक्षा ऍप
– मध्य प्रदेश – नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘एमपीईकॉप’ नावाचे ऍप आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी हे ऍप इन्स्टॉल केले आहे. ऍपमधील ‘एसओएस’ बटण दाबल्यानंतर पाच आपत्कालीन क्रमांकांवर मेसेज पोहोचतो.

– राजस्थान – राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘राजकॉप’ नावाचे ऍप असून ते जवळपास एक लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे. ऍपवर दररोज जवळपास 200 तक्रारींची नोंद होते. कंट्रोल रूममधून एक मिनिटाच्या आत तक्रारदाराला रिटर्न कॉल येतो.

– दिल्ली – राजधानी दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी ‘हिम्मत प्लस’ आणि ‘तत्पर’ ही दोन ऍप आहेत. ‘हिम्मत प्लस’ ऍप डाऊनलोड केले असेल तर आपत्कालीन स्थितीत मोबाईल जोराने हलवला तरी थेट पोलीस कंट्रोल रूमला घटनेची सूचना मिळते. दोन्ही ऍपचे सध्याच्या घडीला एक लाख युजर्स आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या