Video – पुण्यात तरसाचा शेतकऱ्य़ावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा येथे एका तरसाने केलेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले, तर याच तरसाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडल्या.

खरपुडी खंडोबा डोंगर वनपरीक्षेत्रात मोर, तरस, कोल्हा, लांडगा, बिबट्यांचा संचार आहे. यापैकी तरसाने गेल्या काही दिवसांपासून या भागात धुमाकूळ घातला होता. नागरिकांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.

रविवारी सकाळी वाकी बुद्रुक येथील शेतकरी पांडुरंग सहादू जाधव हे शेतावर जात होते. यावेळी तरसाने त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये तरसाने जाधव यांचे हात व पायाला चावा घेत लचके तोडले.

या घटनेनंतर खरपुडी खंडोबा येथील राहुल गाडे हे दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर तरस अचानक आडवे आले. या तरसाला धडक बसल्यामुळे राहुल गाडे हे रस्त्यावर पडले. यावेळी तरसाने गाडे यांच्यावर हल्ला चढवून त्यांच्या हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केले. दरम्यान काही वेळाने पुढे काही अंतरावर जाऊन तरसाचा मूत्यू झाल्याचे वन विभागाच्या वतीने सांगितले.

ग्रामस्थांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी तत्काळ चाकण येथे दाखल केले. मात्र, जखमा गंभीर असल्याने दोघा जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी वनपरीक्षेत्र अधिकारी दत्तात्रय फापाळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.