
सामना ऑनलाईन । इंदूर
मीच निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करते. पक्षाने आता मुक्त मनाने कुठलाही संकोच न बाळगात इंदूरच्या उमेदवाराची निवड करावी, असे पत्र लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी भाजपच्या पक्षनेतृत्वाला पाठवले आहे.
ज्येष्ठ भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनी आठ वेळा लोकसभेत इंदूरचे प्रतिनिधित्व केले आहे. सुमित्रा महाजन पुढच्या आठवडय़ात वयाच्या 76 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. यंदा उमेदवारी देताना भाजपने मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणींसारख्या पक्षाच्या दिग्गज ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे सुमित्रा महाजन यांच्याबद्दल अनिश्चितता होती. अखेर त्यांनीच निवडणूक लढवणार नसल्याचे लेखी पत्राद्वारे जाहीर केले आहे.
भाजपने इंदूरमध्ये अजूनही लोकसभेचा उमेदवार घोषित केलेला नाही. ही अशी स्थिती का आहे? पक्षाला निर्णय घेताना काही संकोच वाटत असेल तर तो नेतृत्वाने सोडून द्यावा. मी पक्षातल्या वरिष्ठांबरोबर याबद्दल आधीच चर्चा केली होती व निर्णय त्यांच्यावर सोडला होता, पण अजूनही ते द्विधा मनस्थितीमध्ये असावेत. असे सुमित्रा महाजन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
जनतेच्या आणि भाजप कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार
इंदूरच्या जनतेने आणि भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या भरभरून पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. पक्षाने इंदूरच्या उमेदवारीबद्दल लवकर निर्णय घ्यावा. त्यामुळे सर्वांसाठी काम करणे अधिक सोपे होईल व गोंधळाची स्थिती संपुष्टात येईल, असेही सुमित्रा महाजन यांनी आपल्या पत्रात सुचवले आहे.
























































