आयफोन 12 लॉन्चिंगपूर्वीच अॅपलला झटका; शेअर 4 टक्क्यांनी घसरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नामांकित स्मार्टफोन कंपनी अॅपलने मंगळकारी आयफोन 12 हा पहिला फाईव्ह जी फोन लाँच केला आहे. या फोनच्या लॉन्चिंग सोहळ्याच्या काहीवेळ आधीच अमेरिकेच्या शेअर बाजारात अॅपल कंपनीचे शेअर 4 टक्क्यांनी घसरले. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य 81 बिलियन डॉलर म्हणजेच 5.94 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. बाजार बंद होण्यापूर्वी मात्र शेअरच्या स्थितीत काहीशी सुधारणा पाहायला मिळाली.

आयफोन 12 लॉन्चिंगपूर्वी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्सची जोरदार विक्री केली. दुपारी 1 वाजेपर्यंत प्रति शेअरची किंमत 119.65 डॉलरवर पोहोचली. तर दुपारी 3.30 च्या सुमारास प्रति शेअसची किंमत 121.97 डॉलर एवढी होती. बाजार बंद झाला त्यावेळी प्रति शेअरची किंमत 121.10 डॉलर एवढी होती.

23 ऑक्टोबरपासून बुकिंगला सुरुवात
मंगळवारी रात्री उशीरा कॅलिफोर्निया येथील अॅपलच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात आयफोन 12, आयफोन 12 मिनी, आयफोन 12 प्रो, आयफोन प्रो मॅक्स आणि स्मार्ट होम पॉड स्पीकर्स लॉंच करण्यात आला. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, आयफोन 12 मिनी हा देशातला सर्वात स्लीम आणि वजनाने हलका फाईव्ह जी स्मार्टफोन आहे. 23 ऑक्टोबरपासून या फोनची बुकींग करता येणार आहे.