पुन्हा कारगिल झाल्यास, निर्णायक युद्ध होईल; हवाई दलप्रमुखांचा इशारा

42

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस धनोआ यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. पुन्हा कारगिल झाल्यास हवाई दल त्यासाठी सज्ज आहे. पुन्हा कारगिल झाल्यास निर्णायक युद्ध होईल आणि या अंतिम लढाईसाठी हवाई दल सज्ज आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानने आता कोणतीही कुरापत केल्यास त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला.

पाच महिने पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र हिंदुस्थानी विमानांसाठी बंद ठेवले होते. पाकिस्तानने मंगळवारी ही बंदी उठवल्यानंतर काही तासातच धनोआ यांनी पकिस्तानला इशारा दिला आहे. हवाई दल कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करायला सक्षम असून आकाशात ढग असतानाही अचूक मारा करण्याची क्षमता हवाई दलाकडे आहे. याचा प्रत्यय 26 फेब्रुवारीला हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकच्यावेळी आला आहे, असेही त्यांनी सांगितले. या एअर स्ट्राईकद्वारे हवाई दलाने आपली क्षमता सिद्ध केली आहे, असे धनोआ यांनी स्पष्ट केले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर हवाई दलाने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी हिंदुस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हिंदुस्थानी हवाई दलाने त्यांना हुसकावून लावले होते. सीमाभागातील युद्धजन्य परिस्थिती आणि दोन्ही देशांत वाढलेल्या तणावामुळे पाकिस्तानने 27 फेब्रुवारीपासून त्यांचे हवाई क्षेत्र हिंदुस्थानसाठी बंद केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या