Women WC 2022 क्रीडाप्रेमींचा श्वास रोखला, हेल्मेटवर चेंडू आदळल्याने स्मृती मंधाना मैदानावर डोके धरून बसली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला काही दिवसच उरलेला असताना हिंदुस्थानी संघ चिंतेत पडला आहे. कारण आज दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या सराव लढतीत टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना हेल्मेटवर वेगवान चेंडू आदळून जखमी झाली. तिला सामना सुरू असतानाच मैदान सोडावे लागले, पण सुदैवाने तिची दुखापत गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर जाहीर केले. त्यामुळे हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

यंदाची महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 4 मार्चपासून सुरु होत आहे. हिंदुस्थानी महिला संघाला आपला सलामीचा सामना 6 मार्चला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध खेळायचा आहे.

स्मृती मंधाना फलंदाजी करीत असताना दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाज शबनीम इस्‍माइलचा बाउन्सर वेगाने तिच्या हेल्मेटवर आदळला. त्यामुळे काही क्षण ती मैदानात डोके धरून बसली होती. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने सुरक्षेचा उपाय म्हणून मैदान सोडले. त्यावेळी ती 12 धावांवर खेळत होती. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी स्मृतीची दुखापत गंभीर नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे हिंदुस्थानाला कंकशन नियमानुसार तिच्या जागेवर दुसरी बदली फलंदाज उतरवता आली नाही. स्मृती पुन्हा फलंदाजी करू शकते असे मत डॉक्टरांनी नोंदवले आहे.

हरमनप्रीतचे शतक

हिंदुस्थानी संघाच्या हरमनप्रीतने 112 चेंडूंत 103 धावांची दमदार शतकी खेळी केली. त्यामुळेच हिंदुस्थानला निर्धारित षटकांत 9 बाद 244 धावांचा पल्ला गाठता आला. कर्णधार मिताली राज शून्यावर तंबूत परतली तर यास्तिका भाटियाने 58 धावांची अर्धशतकी खेळी करीत हरमनला उत्तम साथ दिली.

गायकवाडचा बळींचा चौकार

ऋचा घोष (11), स्नेह राणा (14) आणि पूजा वस्त्रकार (16) या तिघींनाच त्यानंतर दोन अंकी धावसंख्या गाठता आली. विजयासाठी 245 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ 7 बाद 242 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे महिला टीम इंडियाने ही लढत 2 धावांनी जिंकली.दक्षिण आफ्रिकेच्या वतीने कर्णधार सुन लुसने 101 चेंडूंत 94 तर लॉरा वोल्वार्टने 75 धावांची खेळी केली. राजेश्वरी गायकवाडने 4 फलंदाज बाद करीत संघाच्या विजयाला हातभार लावला.