हिंदुस्थानच्या पराभवाचे खापर कुणाच्या माथी ? कोहली, शास्त्री यांची होणार झाडाझडती

22

सामना प्रतिनिधी । लंडन

वर्ल्ड कप जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजले जात असतानाच सेमी फायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागल्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे ‘पोस्टमॉर्टम’ होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेली प्रशासकीय समिती मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांची झाडाझडती घेतानाच पराभवाबद्दल जाब विचारणार आहे. प्रशासकीय समितीत विनोद राय, डायना एडुलजी, रवी थोडगे यांचा समावेश आहे.

धोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवले?

सेमी फायनलसारख्या महत्त्वाच्या लढतीत हिंदुस्थानचा संघ 3 बाद 5 धावा अशा संकटात सापडला असताना महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवले? फलंदाजी सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांच्या सल्ल्यानेच हा निर्णय घेण्यात आलाय असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र या निर्णयाचा फटका टीम इंडियाला बसलाय. त्यामुळे रवी शास्त्री व विराट कोहली गोत्यात येऊ शकतात.  

तीन यष्टिरक्षक संघामध्ये कशाला?

हिंदुस्थानी संघामध्ये तीन यष्टिरक्षक खेळाडूंना स्थान देण्यात आले होते. यामध्ये महेंद्रसिंग धोनीसह दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांचा समावेश होता. दिनेश कार्तिक सुमार फॉर्ममधून जात होता. आयपीएलमध्ये त्याला अपयशाला सामोरे जावे लागले होते. तरीही त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात आली. तसेच टीम इंडियाच्या अंतिम अकरामध्ये या तिन्ही खेळाडूंना संधी देण्यात आली. हे प्रकरणही हिंदुस्थानच्या संघ व्यवस्थापनाला महागात पडू शकते.

आता ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपची तयारी

बीसीसीआयची सर्वसाधारण बैठक होईपर्यंत निवड समितीत बदल होण्याचे संकेत नाहीत. प्रशासकीय समिती एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीसोबतही पुढील वर्षी होणाऱया ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीबाबत चर्चा करील.

अंबाती रायुडूला संधी का नाही?

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अंबाती रायुडूवर विश्वास नसतानाही त्याला वर्ल्ड कपआधीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपर्यंत टीम इंडियाच्या संघात ठेवले. मात्र अंतिम 15मधून त्याला डावलले. त्यानंतर वर्ल्ड कपसाठीच्या पर्यायी खेळाडूंमध्ये त्याचा नावाचा समावेश केला; पण शिखर धवन व विजय शंकर यांच्या दुखापतीनंतरही त्याला संघात संधी दिली नाही. या प्रकरणावरून रवी शास्त्री व विराट कोहली यांचा पाय खोलात जाऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या