
समुद्र हा विविध रहस्यांचा खूप मोठा साठा आहे. यात निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा दोन्ही रहस्यांचा समावेश होतो. अगणित वर्षांपासून काळाच्या विविध टप्प्यांवर ही रहस्यं मानवाला विस्मयात पाडत आली आहेत. अशाच एका नैसर्गिक रहस्याचा खुलासा शास्त्रज्ञांना झाला आहे.
अंटार्क्टिका या दक्षिण ध्रुवीय खंडानजीक समुद्रात एक आश्चर्यकारक गोष्ट शास्त्रज्ञांना आढळली आहे. जीवशास्त्रज्ञांना येथील समुद्राच्या तळाशी माशांची घरं सापडली आहेत. ही घर थोडीथोडकी नव्हे तर 6 कोटी इतक्या प्रचंड संख्येत आहेत.
करंट बायोलॉजी या जर्नलमध्ये या विषयी विस्तृत लेखन करण्यात आलं आहे. हे लेख लिहिणाऱ्या ऑटून पर्सर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. अंटार्क्टिकाजवळील समुद्राला वेडेल समुद्र म्हणतात. या समुद्राच्या तळाशी वसणाऱ्या जैवविविधतेबाबत संशोधन सुरू होतं. सुरुवातीच्या चार तासांमध्ये संशोधकांच्या पथकाला फक्त मासे दिसत होते.
पण, काही वेळाने समुद्राच्या तळाशी त्यांना एक विलक्षण गोष्ट दिसली समुद्राच्या तळाला छोट्या छोट्या आकाराची माशांची बिळं होती. एखाद्या वसाहतीप्रमाणे विशिष्ट अंतरावर ही बिळं दिसून येत होती. या बिळांची संख्या तब्बल 6 कोटी असल्याची नोंद करण्यात आली आहे.
बाथमिस्ट्री नावाच्या प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी ही नोंद केली आहे. हे मासे प्रजननासाठी अशा प्रकारची घरं बांधून राहतात. समुद्रात अपवेलिंग नावाची एक नैसर्गिक यंत्रणा कार्यरत असते. त्यामुळे समुद्राच्या आतील थंड पाणी हे हवेच्या माध्यमातून लाटांच्या स्वरूपात समुद्राच्या पृष्ठभागावर येतं आणि त्या पाण्याचं तापमान तुलनेने वाढतं. अशा वाढलेल्या तापमानाच्या पाण्याचा उपयोग हे मासे दिशादर्शक म्हणून करत असल्याचं संशोधनही बाथमिस्ट्री यंत्रणेने केलं आहे.
या माशांना आईसफिश असं म्हणतात. माशांच्या कॉलनीचा हा परिसर जवळपास 240 किमी इतका पसरलेला आहे. यापूर्वी माशांची इतकी मोठी कॉलनी शास्त्रज्ञांना सापडली नव्हती. यापूर्वी सापडलेली माशांची सर्वात मोठी कॉलनी ही फक्त 60 घरांची होती.

























































