
>>अस्मिता येंडे
व्यक्त होणं ही सहज प्रक्रिया आहे. एखादी गोष्ट किंवा प्रसंग घडला की, व्यक्ती त्यावर विचार करते, चिंतन करते. विचार करण्याची ही शक्ती मानवाला लाभलेली आहे. लेखक विनोद बांदोडकर यांचा ‘प्रतिमा’ हा लेखसंग्रह समाजातील अनेक घटक, समस्यांवर भाष्य करतो. वैचारिक लेखांचा हा संग्रह महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश पाडत आहे. आपण समाजाशी कटिबद्व आहोत ही भावना मनात ठेवून लेखकाने समाजभान जपले आहे. याच विचारांचं प्रतिबिंब पुस्तकात पानोपानी जाणवतं. एकूण 34 लेखांचा समावेश पुस्तकात केलेला आहे.
लेखसंग्रहातील ‘भारतीयांपासूनच धोका भारतीय संस्कृतीला’ या लेखातून हिंदुस्थानी संस्कृतीचं बदललेलं रूप आणि ती जपण्यासाठी काय केले पाहिजे, यावर भाष्य केलेले आहे. पूर्वीच्या काळी परंपरागत असलेले व्यवसाय कालानुरूप कसे विस्मरणात गेले, त्याची कारणे कोणती, तसेच सोन्याचे दागिने घडविणाऱया कारागीरांच्या भावना ‘सुवर्ण कारागीर – एक मनोगत’ या लेखातून व्यक्त केल्या आहेत. अध्यात्म जगण्याचं मर्म कसं शिकवतं, संतसाहित्याचं महत्त्व, त्यांचे योगदान ‘संतसाहित्याचा प्रभाव’ लेखातून मांडले आहे. ‘बकाल शहरीकरण’ , ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ या लेखांतून समाजातील समस्यांवर प्रकाश टाकून त्यावर आपले परखड मत व्यक्त केले आहे. आधुनिकीकरण सुरू असताना आपण नैसर्गिक रचनेला तड़ा देत नाही ना, यावर विचार करणं गरजेचं आहे. जीवन जगत असताना नाती कशी जपावीत, याची सुरेख मांडणी ‘संबंध सौख्य’ लेखातून उदाहरणासहित लेखकाने पटवून दिली आहे.
‘अडगळीसाठी जागा’ हा लेख तितकाचा मनाला भावतो. असंख्य आठवणींची साठवण मनात करता येते याची प्रचीती देणारा हा लेख आहे. ‘शेवटपर्यंत कार्यरत रहा’ हा लेख सकारात्मक ऊर्जा आणि दिशा देणारा आहे. नव्या पिढीला योग्य ते मार्गदर्शन लेखकाने आपल्या लेखातून केले आहे. आपण जी मेहनत करतो, दगदग करतो ती अन्नासाठी. त्यामुळे त्या अन्नाचा मान राखावा आणि अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्नाचं महत्त्व विशद करणारा ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हा लेख आहे. ‘कोरोना काळ’ या लेखातून कोरोनामुळे बदललेल्या जीवनशैलीचं चित्रण केलेले आहे. आधुनिकीकरणामुळे उद्योग – व्यवसायाला लाभलेले नवे रूप, नवी समीकरणे ‘आगे दुकान पीछे मकान’ लेखातून मांडलेली आहे.
सामाजिक, वैचारिक, आध्यात्मिक, निसर्गविषयक, संस्कारक्षम, राष्ट्रविषयक असे अनेक विषय लेखकाने हाताळले आहेत. एक संवेदनशील लेखक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून त्याच्या निरीक्षणातून जे काही आकलन केले त्याला शब्दबद्ध केले आहे. लेखांची शीर्षके इतकी समर्पक आहेत की, लेखाचा सार त्यात सामावलेला आहे. समाजाची आणि आपल्या विचारांची प्रतिमा पुस्तकरूपात पुरेपूर उतरली आहे.



























































