
काहीजण निष्ठावंत असतात, तर काहीजण निष्ठेचे मुखवटे घालून अवतीभवती फिरत असतात. हे मुखवटे घालणारेच गद्दारीचे घाव घालतात. अनंत तरे यांच्यासारखी निष्ठावंत माणसे पुनः पुन्हा मिळत नाहीत. ठाण्याचा विक्रमी विकास करणारे, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवर अढळ श्रद्धा असणारे ‘राजहंस’ अनंत तरे आज असते तर ठाण्यात गद्दार कावळे फडफडले नसते, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.
अनंत तरे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोळी यांनी तरे यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘अनंत आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनंत तरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या निष्ठेचा गौरव केला. ते म्हणाले, अनंत तरे यांच्या जीवनावर बनवलेली ‘तो राजहंस एक’ ही ध्वनिचित्रफीत पाहिली आणि तेव्हाचे ठाणे आठवले. जिवाला जीव देणारे आनंद दिघे, अनंत तरे, मो.दा. जोशी, प्रकाश परांजपे, रघुनाथ मोरे यांच्यासारखी मंडळी आज असती तर कुणाचीही गद्दारीचा ‘ग’ उच्चारण्याची हिंमत झाली नसती आणि पश्चात्ताप होतोय की, अनंत तरे यांचे तेव्हाच ऐकले असते तर शहांच्या चरणी हंबरडा फोडून वाचवा वाचवा म्हणणारेही दिसले नसते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे आणि तरे कुटुंबीयांचे कुलदैवत एकवीरा आई आहे, म्हणजेच आम्ही एकाच आईची लेकरे आहोत, असा उल्लेख केला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना कोळी टोपी घालून सोनेरी मासा भेट देण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे, शिवसेना नेते अरविंद सावंत, खासदार बाळय़ामामा म्हात्रे, लोकनेते दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, एकवीरा देवस्थानचे विश्वस्त नवनाथ देशमुख, उपनेते बबन पाटील, शिवसेना समन्वयक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, डॉ. जस्मीन राजके-तरे, डॉ. दक्षता तरे, कॅप्टन विशाल तरे यांच्यासह ठाणेकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वापर संपल्यावर गद्दारांना कचराकुंडीत फेकतील
ज्याने आईसमान शिवसेनेचा घात केला तो आपलाही घात करेल याची जाणीव त्यांना असेलच. आज गद्दारांना आमिषे दाखवली जात आहेत, पदे वाटली जात आहेत, पण ज्यावेळी गद्दारांचा वापर संपेल तेव्हा त्यांना कचराकुंडीत फेकले जाईल आणि हेच गद्दार कपाळावर हात मारून ठाण्यातल्या रस्त्यावर फिरताना दिसतील, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.
शेती करतो की रेडा कापतो
मुंबई आणि ठाणे महापालिका यांनी लुटल्या. सवा दोन लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे मुंबईवर. हे पैसे कुठे गेले? हेलिकॉप्टर घेतले. हायटेक शेती करायला हेलिकॉप्टरने गावाला जातो. इथे काही झाले की लगेच जातो गावाला. गावाला जाऊन शेती करतो की रेडा कापतो माहिती नाही, असे तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले.
याला म्हणतात शिवसेनेची वाघीण
शिंदे गटाच्या ठाण्यातील खासदाराने शिवसेना आणि अनंत तरे यांची बदनामी केली, त्यावेळी तरे यांच्या वहिनी महेश्वरी तरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदाराला कडकडीत तंबी दिली. हाच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरे म्हणाले, मी तुमची पत्रकार परिषद यूटय़ूबवर पाहिली. याला म्हणतात निष्ठा आणि यालाच म्हणतात शिवसेनेची वाघीण, असा गौरव उद्धव ठाकरे यांनी केला.
सोमवारी मोर्चा… मुळावर येणाऱ्यांना उखडून फेका
ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि सत्ताधाऱयांच्या भ्रष्टाचाराविरोधात सोमवारी मोर्चा निघणार आहे. शिवसेनेसोबत मनसे आणि इतर पक्षही सहभागी होणार आहेत. आता घरातले शत्रुत्व बंद आणि मुळावर येणाऱयांना आधी उखडून फेका. या शत्रूला एकजुटीने उखडून फेकू तेव्हा आपण सगळे एकवीरा आईच्या दर्शनाला जाऊ, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.