गरज पडल्यास निलंबनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – अधीर रंजन चौधरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाविरोधात ठराव लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. शुक्रवारी लोकसभेतील पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अधीर रंजन यांना निलंबित केल्यानंतर विरोधी  I.N.D.I.A च्या खासदारांनी गोंधळ घातला आणि सभागृहातून बाहेर पडले. निलंबनाच्या निषेधार्थ खासदारांनी संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढला.आता पत्रकार परिषदेत अधीर रंजन चौधरी यांनी गरज पडल्यास निलंबनाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही जाणार असल्याचे सांगितले आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ही एक नवी घटना असून खासदारकीच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच असा अनुभव येत आहे. हा विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून जाणूनबुजून केला जात आहे. हा लोकशाही दडपण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस नेता आणि वकील मनिष तिवारी यांनी आपल्या विधानात म्हंटले की, अधीर रंजन आपल्या निलंबनानंतर सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.  तर अधीर रंजन यांनी  गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

शुक्रवारी राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले की, पंतप्रधानांसाठी नीरव मोदी यांचा उल्लेख केल्यानंतर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतून केलेले निलंबन योग्य नाही. लोकसभेत अविश्वास ठरावावर झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका आणि त्यांच्या वर्तनामुळे शुक्रवारी त्यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले होते आणि त्यांच्याविरोधात याप्रकरणी तपासासाठी विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले आहे.