
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी आजघडीला लोकसभेची निवडणूक झाली तर काय घडेल याचा वेध घेणाऱ्या देशव्यापी सर्वेक्षणाचे निष्कर्ष आज जाहीर केले. सध्या आहे तशीच राजकीय समीकरणे कायम राहिली तर भाजपप्रणीत एनडीए 276 जागा जिंकून स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्तेवर येईल असे भाकीत करण्यात आले आहे, मात्र शिवसेनेसारख्या मित्रपक्षांनी भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी काँग्रेसला साथ कायम राखली तर यूपीए 244 जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर येईल. तरीही 71 जागा इतर पक्षांच्या पदरात पडणार असल्याने सत्तेचीं सूत्रे त्या पक्षांच्या हाती जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मात्र सध्याची राजकीय समीकरणे आहेत तशीच राहिली तरीही भाजप एनडीएचे संख्याबळ 2014 पेक्षा पाचने घटेल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘जैसे थे’ राजकीय परिस्थितीत राज्यात एनडीएला 36 जागा मिळतील, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या जागा दुपटीने वाढून 12 होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.राज्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वबळावर लढले तर त्यांची खरी ताकद समोर येईल. तसे झाले तर भाजपला 22, काँग्रेसला 11, राष्ट्रवादीला 8, शिवसेनेला 7 जागा मिळतील, असा निष्कर्ष एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी सर्वेक्षणानंतर काढला आहे.
अखिलेश आणि मायावती एकत्र आल्यास यूपीत फटका
80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोन पक्ष एकत्र झाल्यास भाजप-एनडीएला मोठा फटका बसेल असेच वातावरण आहे. सपा-बसपा आघाडीला 42, एनडीएला 36 तर यूपीएला 2 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
फडणवीस यांना बदलण्याची इच्छा तीव्र
देशाचा मूड बिघडलेला असताना आपण कोणाला बदलणार या प्रश्नावर महाराष्ट्रातील 41 टक्के लोकांना काहीच सांगता आले नाही. गावचा सरपंच, महानगराचा महापौर, मुख्यमंत्री, पंतप्रधान असे पर्याय दिले असता 59 टक्क्यांपैकी बहुसंख्य लोकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली.



























































