
देशभरातच भटक्या कुत्र्यांमुळे दिवसेंदिवस समस्या वाढत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला करून चावा घेतल्यास या कुत्र्यांना खायला अन्न देणारे जबाबदार असतील, अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी न्यायालयाने केली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा रेबिज होऊन जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. भटक्या कुत्र्यांना मारावे यासाठी विविध संस्थांनी आदेश दिले. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. केरळ सरकारनेही भटक्या कुत्र्यांवर उपाय काढावा, अशी मागणी केली होती. यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
लोकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क
आपल्यापैकी बहुतेकजण श्वानप्रेमी आहेत. मी पण कुत्र्यांना अन्न देतो; पण लोकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यात समतोल राखला पाहिजे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तर्कशुद्ध तोडगा हवा, असे न्यायमूर्ती खन्ना यांनी सांगितले.
उपचाराचा खर्च द्यावा
भटक्या कुत्र्यांनी लोकांवर हल्ला केल्यास या कुत्र्यांना अन्न देणाऱया व्यक्तींना उपचाराचा खर्च द्यावा लागेल. तसेच कुत्र्यांच्या लसीकरणाचीही जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी महत्वपूर्ण सूचना न्यायालयाने केली.
कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या महाराष्ट्रात 2 लाख 31 हजार घटना
2022 मध्ये पहिल्या सहा महिन्यांत देशभरात 14.5 लाखांहून अधिक लोकांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. सर्वाधिक घटना तामिळनाडूत नोंदविण्यात आल्या असून, महाराष्ट्रात 2 लाख 31 हजारांवर घटनांची नोंद आहे.
2019 मध्ये देशभरात 72 लाख 66 हजार जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यात सर्वाधिक उत्तरप्रदेशात 27 लाख 52 हजार घटना नोंदविल्या गेल्या. 2020 मध्ये देशभरात 46 लाख 33 हजारांवर तर 2021 मध्ये 17 लाखांवर लोकांचा कुत्र्यांनी चावा घेतला. देशात दरवर्षी कुत्रे चावल्यामुळे सरासरी 100हून अधिक रेबिज प्रकरणे होऊन मृत्यू होतात.
2019च्या गणनेनुसार देशात 1 कोटी 53 लाखांवर भटके कुत्रे आहेत. उत्तरप्रदेशात सर्वाधिक 20 लाख 59 हजार, महाराष्ट्रात 12 लाख 76 हजार भटक्या कुत्र्यांची नोंद आहे.





























































