
सामना प्रतिनिधी । माजलगाव
चार वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न रखडला असून सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. धनगर समाजाला तात्काळ आरक्षण न मिळाल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा राज्याचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
माजलगाव येथे आज धनगर समाजाच्या वतीने महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उत्तमराव जानकर, शिवाजी राऊत, कल्याण आबूज, डॉ. भगवान सरवदे, प्रकाश गवते आदींची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून ‘धनगड’ व ‘धनगर’ या शब्दच्छलात आमचे आरक्षण रखडले आहे. शिफारस पाठवून काहीही होत नाही, शासनाने यासंदर्भात परिपत्रक काढण्याची गरज आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आता रस्त्यावर उतरला आहे. दोन महिन्यात जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
१९ जानेवारीपासून चवदार तळे ते मंत्रालय रॅली
मनमाड येथेही आज धनगर समाजाचा महामेळावा झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीने आरक्षण दिले नाही. भाजपनेही आमची थट्टा चालवली आहे. या अन्यायाच्या विरोधात आता ११ व १२ डिसेंबर रोजी धनगर समाजबांधव आपल्या घरावर काळी गुढी उभारून निषेध करतील. १९ जानेवारीपासून महाड चवदार तळे ते मंत्रालय अशी रॅली काढण्यात येणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले.




























































