
सामना ऑनलाईन । मुंबई
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे, सिग्नल मोडणे, मालवाहू वाहनातून प्रवासी नेणे आणि क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, दारू पिऊन गाडी चालवणे आणि गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स आता किमान तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देशच शासकीय निर्णयानुसार पोलिसांना दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय रस्ता सुरक्षा समितीची स्थापना केली आहे. राज्यातील रस्ते अपघाताताचे प्रमाण आणि त्यात जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत दरवर्षी दहा टक्के घट करण्याकरिता ही समिती प्रयत्न करते. रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक नवी दिल्ली येथे राज्याचे मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत राज्यातील वाढते अपघात, जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार वाहतूकीचे विविध नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याबाबत निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
कारवाईचा अहवाल सादर करा !
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यासाठी परिवहन कार्यालयास पाठवण्यात आलेली प्रकरणे अत्यंत नगण्य असल्याने रस्ता सुरक्षा समितीने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल रस्ता सुरक्षा समितीला सादर करण्यास सांगितले आहे.‘































































