
सामना ऑनलाईन । जामखेड
अनधिकृत कलाकेंद्रे बंद करण्याचे नगर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जामखेड प्रशासनाकडून पायदळी तुडवून केराची टोपली दाखवली आहे. कलाकेंद्रे मात्र धुमधडाक्यात सुरुच आहेत. शहरातील व तालुक्यातील मोहा हद्दीतील अनधिकृत कलाकेंद्र बंद करण्याचा आदेश नगर अप्पर जिल्हाधिकारी यांनी 2 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाला मेलद्वारे दिला होता. त्यानुसार तहसील प्रशासनाने 5 नोव्हेंबर रोजी संबंधितांना हा आदेश दिला असतानाही प्रशासनाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे कलाकेंद्र सुरूच आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. अनधिकृत कलाकेंद्रे बंद झाली नाहीत तर 24 नोव्हेंबरला रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अनधिकृत कलाकेंद्रामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी, अवैध दारू विक्री, वेश्या व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. यामुळे गावात तणाव निर्माण होत आहे. त्याविरोधात मोहा, नानेवाडी, हापटेवाडी, रेडेवाडी, पांडववस्ती येथील ग्रामस्थांनी मोहा फाटा येथे मुळे 6 आक्टोबरला रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने तातडीने अनधिकृत कलाकेंद्रे बंद करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते. नगरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन अनधिकृत 6 कलाकेंद्रे बंद करण्याचे आदेश 2 नोव्हेंबर रोजी दिले असताना फक्त दोनच दिवस कलाकेंद्रे बंद होती. त्यानंतर राजरोसपणे ही कलाकेंद्रे सुरू आहेत.
ग्रामस्थ तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यासाठी आले असता तहसीलदारांटी बैठक सुरू होती. तहसीलदारानी सांगितले आम्ही पोलीसांना आदेश दिले आहेत. तेव्हा पोलीस ठाण्यात जा. ग्रामस्थ पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेले त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनी निवेदन स्वीकारले आणि तहसीलदारांकडून आम्हाला आदेश आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना भेटा असे सांगितले. प्रशासनाच्या या टोलवाटोलवीने ग्रामस्थ चांगलेच संतापले व परत तहसीलदारांकडे गेले. त्यावेळी तहसीलदारांनी पोलीस ठाण्याला फोन लावला व आदेश दिला आहे असे सांगितले. आज परत स्मरणपत्र पाठवतो असेही सांगितले. कलाकेंद्र बंद झाले नाहीत तर येत्या २४ तारखेला सकाळी 10 वाजता संपुर्ण गाव रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच शिवाजी डोंगरे, शिवाजी गर्जे, वामन डोंगरे, किसन घुमरे, बाळासाहेब बांगर, संजय डोके, नवनाथ रेडे, सचिन सांगळे यांच्या सह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
































































