व्याज नको आता फक्त मुद्दलच द्या…!! पोलिसांचे टशन अन अवैध सावकारीला वेसण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवनाथ शिंदे, पुणे

गोरगरिबांकडून व्याजापोटी अव्वाच्या सव्वा टक्केवारीने लुबाडणूक करणाऱ्या अवैध सावकारीला पुणे पोलिसांनी चांगलीच वेसण घातली आहे. खंडणीखोरांसह बेकायदेशिररित्या सावकारी करणाऱ्यांविरूद्ध थेट गुन्हे दाखल करून कारागृहात रवानगीचा धडाका लावल्यामुळे संबंधितांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनेक सावकारांकडून आता कर्जदारांकडून व्याज न घेता फक्त मुद्दल घेउन व्यवहार मिटविला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी नागरिकांना तक्रारीचे आवाहन केले होते. त्यानुसार संबंधित बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली. त्यातच संसाराचा गाडा चालविण्यासाठी गोरगरीबांनी घेतलेल्या मुद्दलाच्या बदल्यात जादा व्याज उकळण्यासह त्यांना मारहाण करणे, कुटुंब संपविण्याची धमकी देणे, अपहरण करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर दादागिरी करीत धमकावून नागरिकांकडून व्याज वसूल करणाऱ्या सावकारांचा बिमोड करण्यासाठी खंडणी विरोधी पथकांसह स्थानिक पोलिसांनी प्राधान्य दिल्यामुळे अवैध सावकारीला खोडा बसला आहे. दरम्यान, कोरोना कालावधीत अनेकांचे रोजगार आणि व्यवसाय बुडाल्याने खासगी सावकारकीचे पेव वाढले होते. आर्थिक ओढाताण भागविण्यासाठी अनेकांकडून शेकडा 5 ते 50 टक्क्यांपर्यंत व्याजाने रक्कम घेतली जात होती. मात्र, सावकारांविरूद्ध पोलिसांकडून कारवाईच्या धास्तीने आम्हाला व्याज नको फक्त मुद्दल परत द्या, अशी विनवणी कर्जदारांना केली जात आहे.

खंडणीखोरांसह सावकारांना इंगा दाखविण्यासाठी दोन स्वंतत्र खंडणी विरोधी पथकांकडून कारवाई केली जात आहे. त्याशिवाय पोलीस ठाण्यातंर्गत दाखल तक्रारीनुसारही कारवाई केल्यामुळे सर्वसामान्यांची लुटमार थांबण्यास मदत झाली आहे. हद्दीत भाईगिरी करीत पथारीवाल्यांकडून हप्ता घेणे, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडून दरमहिन्याला खंडणी गोळा करणे, किरकोळ व्यावसायिकांना धमकावून वसुली करणाऱ्यांची कुंडली तपासली जात आहे. त्याशिवाय व्याजाने पैसे देउन फ्लॅट आणि मोकळ्या जागेच्या खरेदी खत बळकाविण्याच्या घटनांना आळा बसला आहे. त्याशिवाय वाहनांच्या मालकी हस्तांतरणाच्या पिळवणुकीला लगाम घालण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे खासगी सावकारीचे ग्रहण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

अवैध सावकारांच्या कुंडली तपासीला प्राधान्य

नागरिकांकडून कुटूंबियांचे आजारपण, व्यवसायातील संकट दुर करणे, कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी व्याजाने पैसे घेतले जातात. मात्र, दर महिन्याला प्रती शेकडा 5 ते 50 टक्क्यांपर्यंत व्याज सावकारांकडून वसुलीमुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अवैध सावकारीद्वारे गोरगरिबांची आर्थिंक फसवणूक करणाऱ्यांची कुंडली तपासण्यात येत आहे. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कायदा सुव्यवस्थेसह नागरिकांची आर्थिक सुरक्षिता गरजेची आहे. त्याअनुषंगाने अवैध सावकारीविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः हप्तेखोर, खंडणीखोर आणि अवैध सावकरांचा फास आवळल्यामुळे गोरगरिबांची फसवणूक टाळण्यास मदत झाली आहे. सावकारांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जोपर्यंत अवैध सावकारी संपुष्टात येत नाही, तोपर्यंत कारवाई सुरूच ठेवणार आहे.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर