चिपळूणच्या केतकी-करंबवणे खाडीत सक्शन पंपाद्वारे बिनधास्त बेकायदेशीर वाळू उत्खनन; शासनाचा महसूल बुडीत

चिपळूण तालुक्यातील केतकी-करंबवणे खाडी परिसरात रात्रीच्या सुमारास सक्शन पंपाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनधिकृत व्यवसायाकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या बेकायदेशीर वाळू उपशामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून अनधिकृत व्यावसायिकांचे फावले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. शासनाकडून लिलाव प्रक्रियेद्वारे वाळू उपशाची अधिकृत परवानगी घेतलेल्या व्यावसायिकांवर यामुळे अन्याय होत असून त्यांना अप्रत्यक्ष आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी या संदर्भात अनेक वेळा महसूल विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. रात्रीच्या वेळी हा वाळू उत्खननाचा प्रकार अधिक तीव्रतेने सुरू असतो. मात्र, त्या वेळी गस्तीवर असणारे महसूल अधिकारी व कर्मचारी नेमके कुठे असतात? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या गंभीर प्रकाराकडे नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, तसेच दोषी अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.