अमरनाथ यात्रेसाठी अभेद्य सुरक्षा कवच; ड्रोन आणि श्वान पथकांकडून चोख नजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) तब्बल 670 कंपन्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात येत आहेत. याशिवाय ड्रोन, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा आणि श्वान पथकांच्या मदतीने संपूर्ण यात्रामार्गावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. यात्रेला अवघा महिनाभराचा कालावधी उरला असताना सुरक्षा दलांनी तयारीला वेग दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय दलांचे आगमन सुरू झाले असून लखनपूरपासून ते अमरनाथ गुहेपर्यंतच्या संपूर्ण मार्गावर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारली जात आहे. यंदा मागील वर्षांच्या तुलनेत अधिक मोठ्या प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जम्मूच्या भगवती नगर येथील मुख्य बेस कॅम्पमध्ये वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला. यात्रेकरूंना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी नोंदणी केंद्रे, आरएफआयडी सुविधा, आरोग्य सेवा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेची तयारी अधिक मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात्रेदरम्यान महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे रिअल-टाइम निगराणी ठेवली जाणार आहे. तसेच लंगर, विश्रांती केंद्रे आणि संवेदनशील भागांमध्ये श्वान पथकांच्या मदतीने नियमित तपासण्या करण्यात येतील. कोणत्याही संभाव्य धोक्याचा वेळीच शोध घेऊन त्वरित कारवाई करण्यावर सुरक्षा यंत्रणांचा भर राहणार आहे. असे वृत्त आज तक ने दिले आहे.

यात्रेकरूंच्या सुरक्षित प्रवासासाठी पठाणकोट-जम्मू महामार्ग, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग तसेच विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या निवास आणि विश्रांती केंद्रांवर विशेष सुरक्षा तैनात केली जाणार आहे. पहलगाम आणि बलताल या दोन्ही प्रमुख मार्गांवर केंद्रीय सुरक्षा दल सतत गस्त घालणार आहेत. अमरनाथ गुहा परिसरातील उंच डोंगराळ भाग आणि संवेदनशील ठिकाणांची जबाबदारी सैन्याकडे सोपवण्यात आली असून स्थानिक स्तरावरील सुरक्षा व्यवस्थेत जम्मू-काश्मीर पोलीस महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

यात्रेशी संबंधित घोडेवाले, हमाल, स्वयंसेवक आणि इतर सेवा पुरवणाऱ्यांची सखोल पडताळणी सुरू असून त्यांना विशेष ओळखपत्रे दिली जात आहेत. प्रत्येक व्यक्तीची पार्श्वभूमी तपासूनच त्यांना यात्रेशी संबंधित कामकाजात सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार आहे. अमरनाथ यात्रेत दरवर्षी लाखो भाविक सहभागी होतात. त्यामुळे यंदा यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा आराखडा तयार केला असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.