
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पाकव्याप्त कश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या धक्क्यातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अजूनही सावरलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार पाकिस्तानात घुसून आणखी एखादा स्ट्राइक करू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
हिंदुस्थानच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर अजूनही तणाव कायम आहे आणि हिंदुस्थानातील लोकसभा निवडणुका संपेपर्यंत तो कायम राहील असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानने कोणतेही आक्रमक पाऊल उचलल्यास त्याचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या 26 फेब्रुवारीला हिंदुस्थानी लष्कराने पाकव्याप्त कश्मीरमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर हल्ला करून तो उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर दुसऱयाच दिवशी पाकिस्तानी विमानेही हिंदुस्थानच्या सीमेत घुसली होती. परंतु हिंदुस्थानी हवाई दलाने त्यांना पिटाळून लावले होते. त्यात पाकिस्तानचे एक एफ-16 विमानही हिंदुस्थानने उद्ध्वस्त केले होते.


























































