पाकड्यांना खूश करण्यासाठी मुस्लिम कार्ड, इम्रान खान यांची अणुयुद्धाची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर मुद्द्यावर एकाही राष्ट्राचे समर्थन न मिळाल्यामुळे चवताळलेल्या पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी आता पाकडय़ांना खूश करण्यासाठी मुस्लिम कार्डाचा वापर सुरू केला आहे. कश्मीरसाठी आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहोत. हिंदुस्थानप्रमाणे आमच्याकडेही अण्वस्त्र आहेत. त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल असे म्हणत खान यांनी एक प्रकारे अणुयुद्धाचीच धमकी दिली आहे.

फ्रान्सच्या दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. तसेच कश्मीर मुद्दा हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे ठणकावून सांगितले. मोदी यांच्या या पवित्र्याने हादरलेल्या इम्रान खान यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावून त्यात पुन्हा एकदा कश्मीरचा राग आळवला. कश्मीर मुद्दा आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला आहे. आता येत्या महिन्यात हा मुद्दा जागतिक स्तरावर यूएनजीएममध्ये उपस्थित करू असेही इम्रान खान म्हणाले.

यापुढे आम्ही बालाकोटसारखे हल्ले होऊ देणार नाही. जोपर्यंत कश्मीर स्वतंत्र होत नाही तोपर्यंत कश्मीरचा मुद्दा आम्ही सर्वच स्तरांवर लावून धरू, अशी दर्पोक्तीही इम्रान खान यांनी यावेळी केली. आम्ही सर्वच प्रमुख देशांसमोर कश्मीरचा मुद्दा मांडलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंदर्भातही 1965 नंतर पहिल्यांदाच कश्मीरच्या मुद्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी असे आपल्याकडून नेहमीच प्रयत्न केले गेले आहेत; परंतु 370 कलम रद्द करून पंतप्रधान मोदींनी मोठी चूक केली, अशी वायफळ बडबडही पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकारांसमोर केली.