
सामना प्रतिनिधी । मुंबई
उपनगर व शिवाजीनगर परिसरात गुरुवारी भरदुपारी अवघ्या अर्ध्या तासातच हेल्मेट घातलेल्या दोन चोरटय़ांनी पाच महिलांच्या गळ्यातून सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहेत.
बोधलेनगर येथील पुष्पावती भिकाजी कुलथे (७१) या दुपारी दीड वाजता शिवाजीनगरच्या जनता विद्यालयाजवळून पायी जात होत्या. काळ्या रंगाच्या दुचाकीवरून समोरून आलेल्या दोन चोरटय़ांनी कुलथे यांच्या गळ्यातून दोन तोळे वजनाची व ४० हजारांची सोन्याची पोत ओरबाडून पळवली. काही वेळातच याच चोरटय़ांनी उपनगरच्या कन्हैया स्वीटजवळ सुनीता प्रभाकर टर्ले, विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ जयश्री गुंबाडे, डावखरवाडी येथील त्रिकोणी बागेजवळ मधुरा तुकाराम कुसाळे, तर म्हसोबा मंदिराजवळ सायली विजय महाले यांच्या गळ्यातून मंगळसूत्रे पळवली. या पाच घटना अवघ्या अर्ध्या तासात घडल्या असून एकूण पाच तोळे वजनाचे दागिने या चोरटय़ांनी लंपास केल्याची माहिती उपनगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी कुलथे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिसरात दोन ते तीन सीसीटीव्ही कॅमेऱयांमध्ये हे २५ ते ३० वर्षे वयोगटातील चोरटे कैद झाले असून, त्यांच्या तपासासाठी दोन पथके रवाना केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. शिंदे यांनी दिली आहे.































































