रामनवमी मिरवणुकीत गोळीबार, भाजप आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; पिस्तूल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील तितलगड येथे रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गोळीबार केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार नबीन कुमार जैन या भाजप आमदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तितलगडचे आमदार जैन यांनी मिरवणुकीदरम्यान सायंकाळी आनंदाच्या भरात त्यांच्या परवानाधारक 0.32 बोर पिस्तूलमधून तीन फायर केले. या मिरवणुकीत शेकडो नागरिक आणि भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. व्हिडिओ समोर आल्यानंतर बलांगीरचे पोलीस अधीक्षक तातडीने तितलगड येथे पोहोचले.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 125 तसेच शस्त्र कायद्याच्या कलम 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. “सार्वजनिक ठिकाणी बेफिकीर वर्तन आणि शस्त्र बाळगण्याबाबत कारवाई करण्यात आली असून संबंधित पिस्तूल जप्त करण्यात आले आहे,” अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

याशिवाय, आमदारांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यालाही (PSO) चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये तो आमदारांना पिस्तूल हाताळण्यास मदत करताना दिसत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर संबंधित PSO ला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना आमदार जैन यांनी हा प्रकार केवळ “मजेत केलेली कृती” असल्याचे सांगितले. “ते पिस्तूल खरे नसून खेळण्याचे होते,” असा दावा त्यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना केला.