साताऱ्यातील गिरवी गावातील सात जणांवर ‘मोक्का’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फलटण तालुक्यातील गिरवी येथील दिगंबर आगवणे, त्यांची पत्नी जयश्री आगवणे व अन्य पाचजण अशा एकूण सातजणांवर मोका कारवाई करण्यात आली आहे.

दिगंबर रोहिदास आगवणे, जयश्री दिगंबर आगवणे, स्नेहल रवींद्र बनसोडे (सर्व रा. गिरवी, ता. फलटण), आदिनाथ काशिनाथ मोटे (रा. सरडे, ता. फलटण), नितीन कालिदास करे (रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव), सागर गायकवाड (रा. आसू, ता. फलटण), अनिल रामचंद्र सरक (रा. नांदल, ता. फलटण) अशा सातजणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी त्यांच्यावर मोका कारवाईस मंजुरी दिली आहे.

दिगंबर आगवणे व संबंधितांवर बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदेशीर व गैरमार्गाने जमिनी बळकाविणे, बनावट कंपन्या स्थापन करून बँक अधिकाऱयांना हाताशी धरून बँकांकडून कोटय़वधी रुपयांची कर्जप्रकरणे मंजूर करून घेणे, बनावट सह्या करून बनावट कर्ज काढणे, खंडणी अपहरण, दहशत पसरविणे, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे आदी गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.

जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी कार्यभार स्वीकारताच, सातारा जिह्यातील गुन्हेगारी टोळय़ांवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी जिह्यातील गुन्हेगारी टोळय़ांवर लक्ष केंद्रित करून दहशत व आर्थिक फायद्याकरिता संघटितपणे गुन्हे करणाऱया गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी या संबंधितांविरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून पाठवला होता. त्यास फुलारी यांनी मंजुरी दिली.