बर्थडे पार्टीत ऑर्केस्ट्राच्या तरुणींनी नकार दिला. तर काही नराधम तरुणांनी दोन तरुणींचे बंदुकीच्या जोरावर अपहरण केले आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. काही आरोपी पळून जात होते तेव्हा पोलिसांनी त्यांच्या पायावर गोळी मारली आणि त्यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या कुशीनगर भागात आठ मित्र राहत होते. नागेन्द्र यादव, आसन सिंह, कृष तिवारी, अर्थक सिंह, अजीत सिंह, विवेक सेठ, निसार अन्सारी आणि आदित्य साहनी त्यांची नावं. त्यापैकी अजित सिंहचा वाढदिवस होता. म्हणून त्याच्याच घरी पार्टी करायला सगळे मित्र जमा झाले होते. रात्रभर दारू पिऊन आता त्यांना ऑर्केस्ट्रामधील तरुणींना डान्स पहायचा होता. त्यासाठी कुशीनगर भागात राहणाऱ्या चार तरुणींना त्यांनी फोन केला आणि आताच्या आता आम्हाला डान्स शो करून दाखवा अशी मागणी केली. पण या तरुणींनी नकार दिला. चार तरुणी मूळच्या बंगाली असून त्या इथे भाड्या राहत होत्या. आणि ऑर्केस्ट्रामध्ये नाचून आपलं पोट भरत होत्या.
हे आठ तरुण या तरुणींच्या घरी पोहोचले. बंदुकीच्या जोरावर दोन तरुणींना गाडीत कोंबलं. स्थानिकांनी या तरुणांना विरोध केला तेव्हा हवेत गोळीबार करून त्यांनी दहशत पसरवली. या तरुणींना घेऊन हे तरुण पळून गेले. अजितच्या घरी या नराधमांनी या तरुणींवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांना या बद्दल कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणींची सुटका केली आणि सहा आरोपींना अटक केली. निसार अन्सारी आणि आदित्य साहनी जेव्हा पळूत जात होते आणि त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या पायावर गोळी मारली. दोन्ही जखमी आरोपींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आठही आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली.