
सामना ऑनलाईन । मुंबई
102 वर्षाची सोनेरी परंपरा असलेली नॅशनल लायब्ररी मुंबई उपनगरातील वांद्रे येथील सांस्कृतिक वैभव आहे. आज अपरिहार्य कारणाने वाचन, वाचक कमी होत चालले आहेत. त्यामुळे वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी, वाचकांना घरपोच पुस्तके वाचता यावीत आणि त्यांची वाचनाची सवय कायम रहावी यासाठी नॅशनल लायब्ररीने नवीन फिरते वाचनालय सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संस्थेच्या आवारात शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय अॅड. आशीष शेलार आणि सुप्रसिद्ध अभिनेते ‘भटकंती’ कार मिलिंद गुणाजी याच्या हस्ते पार पडला.
“प्रत्येक माणसाने शक्य होईल तेथे तेथे वाचत राहिले पाहिजे”, असे अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी नॅशनल लायब्ररी, बांद्रा येथे वाचनालयाच्या फिरते ग्रंथालय उपक्रमाचे उद्घाटन करताना म्हटले. “मी आज जे काही आहे ते प्रचंड वाचंनामुळेच आहे. तुम्हीही वाचल पाहिजे” असेही ते पुढे म्हणाले. तर संस्थेचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांनी आता शासनाने पुस्तकांबरोबरच पुस्तकांच्या मोबाईल व्हॅनसाठीही अनुदान द्यावे, जेणेकरून लायब्ररीला जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचता येईल. या उत्तरोत्तर रंगणाऱ्या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी रश्मी वारंग यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला लेखक अनिल कालेलकर, ग्रंथालय संचालक सुभाष राठोड, शालिनी इंगोळे, संजय बनसोड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर, संस्थेचे अध्यक्ष अतुल मोहिले, कार्याध्यक्ष दीपक पडवळ, कोषाध्यक्ष अनिल जोशी, संयुक्त कार्यवाह सुनील धोत्रे, कार्यकारणी सदस्य विद्याधर झारापकर, साहित्यिका ज्योती कपिले, वृषाली शिंदे सहित वितरणाचे सुधीर शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.





























































