
सध्या जगभरात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. अंगदुखी, घशातली खवखव, कोरडा खोकला यामुळे त्रस्त झालेल्यांना हलका आहार घ्यावासा वाटतो. अशा वेळी आहारात घशाला त्रास न होणाऱ्या हलक्या अन्नपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. जेणेकरून शरीराचे पोषण होईल आणि घशालाही आराम मिळेल. डॉक्टरही अशाच पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. पाहूया हे अन्नपदार्थ कोणते ?
दही
ओमिक्रॉनचे संसर्ग झाल्यास दही खाणे अधिक फायदेशीर आहे. दही थंड असून यामध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. दही खाल्ल्याने भूक कमी लागते. शरीरात ओमिक्रॉनची लक्षणे दिसू लागल्यास आहारात दह्याचा समावेश करू शकता. दह्यामध्ये ग्रॅनोला घालून सेवन करा. पोटॅशियम मिळावे याकरिता केळ्याचे छोटे छोटे तुकडे करावेत आणि ते दह्यात घालून खावेत. याशिवाय जीवनसत्त्व डी युक्त अन्नपदार्थही घ्यावेत. यासाठी मशरूम, अंड, दूध हे पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट करावेत.
सूप आणि शोरबा
घशाला आराम मिळावा याकरिता सूप किंवा शोरबा या अन्नपदार्थांचा समावेश रोजच्या जेवणात करण्यास हरकत नाही. कारण यामध्ये जास्त प्रमाणात इलेक्ट्रोलाईट घटकांचा समावेश असतो. तुम्हाला भूक लागली असेल तर सूपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेशही करू शकता. यामुळे शरीराचे पोषण होऊन संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी शक्ती मिळते.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमुळे ओमिक्रॉन संसर्गाशी लढण्यासाठी फायदा होतो. याकरिता पालक, कोबी, फ्लॉवर, मेथी या भाज्यांचे सेवन करावे. या भाज्यांचे सूपही आहारात घेऊ शकता. रोजच्या जेवणात हलका आहार घ्या.
प्रोटिन शेक आणि इलेक्ट्रोलाईट ड्रिंक
प्रोटिन शेक स्मुदिपेक्षाही पचायला हलके असते. त्यामुळे घशावर ताण येत नाही. त्यामुळे तुमच्या आवडीची प्रोटिन पावडर दूध किंवा पाण्यात मिसळून घेऊ शकता तसेच इलेक्ट्रोलाईट ड्रिंक ओमिक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांनी घेणे फायदेशीर ठरते. अशा वेळी जुलाब आणि उलटीची समस्या असल्यास इलेक्ट्रोलाइट्सयुक्त ड्रिंक प्या. यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रणात राहिल. याकरिता इलेक्ट्रोल पावडरचे सेवन करू शकता. जी तुम्हाला कोणत्याही औषधांच्या दुकानात मिळू शकेल.
आंबट फळाचे सेवन
शरीरातील आजारांशी लढण्याकरिता संसर्गजन्य आजारांशी लढण्याकरिता जीवनसत्त्व सी आवश्यक असते. रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी या जीवनसत्त्वाची मदत होते. याकरिता आहारात पेरू, किवी, ब्रोकली, स्ट्रॉबेरी आणि पपई ही फळे आणि भाज्यांचा समावेश करावा.




























































