
करमाळा तालुक्यातील ढोकरी येथील उजनी जलाशय परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱया तीन यांत्रिक बोटींवर महसूल विभागाच्या पथकाने धाडसी कारवाई करीत या बोटी नष्ट केल्या आहेत. यातील 1 बोट अंधाराचा फायदा घेऊन पाण्यात पळवून नेण्यात आली. येथून महसूल विभागाने 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
तहसीलदार समीर माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकामध्ये निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, महसूल नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडल अधिकारी किरण खारव, रेवणनाथ वळेकर, तलाठी उमेश बनसोडे, मोहसिन हेड्डे, आनंदा डोणे, साईनाथ आडगटाळे, संजय शेटे, बाळासाहेब कांबळे, कोतवाल नितीन हत्तीकट, पोलीसपाटील अभिजित वळसे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल महेश बचुटे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
या कारवाईत झारखंड राज्यातील इमरान शेख, हानिफ शेख, नासीर शेख, कलू शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरील बोटी या विकास देवकर, तेजस सोनवणे, कुणाल खडके, गणेश लोंढे, बिजू साळुंके, गणेश इसगुडे (सर्वजण रा. इंदापूर, जि. पुणे) येथील असल्याचे कामगारांनी सांगितले. सर्व कामगार व बोटी मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उजनी जलाशय परिसरात होणारा अवैध वाळूउपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी विविध पथके तैनात केली आहेत. ही पथके तालुक्यात सर्व ठिकाणी गस्त घालणार आहेत. यासंबंधी प्रत्यक्ष सहभागी असणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. – समीर माने, तहसीलदार, करमाळा
























































