भल्या पहाटे यशवंत जाधव यांच्या घरी आयटीचे पाहुणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. आयकर अधिकाऱयांनी शुक्रवारी सकाळी यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घर आणि मालमत्तेवर छापेमारी करत कागदपत्रांची तपासणी केली. परंतु नेमकी कोणत्या प्रकरणात आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे हे समजू शकलेले नाही.

आयकर विभागाचे अधिकारी सीआरपीएफ जवानांसह शुक्रवारी सकाळीच यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी दाखल झाले आणि घरातच जाधव यांची चौकशी सुरू करत कागदपत्रांची तपासणी केली. आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती, त्यानुसार ही छापेमारी केल्याचे समजते. दरम्यान, तपास सुरू असल्याने इमारतीबाहेर मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अटक केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मंत्रालयाशेजारी महाविकास आघाडीचे जे धरणे आंदोलन झाले होते त्यामध्ये यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव सहभागी झाल्या होत्या. त्याच्याच दुसऱयाच दिवशी जाधव यांच्या घरी धाड पडल्याने केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.