#INDvsNZ दोन षटकार ठोकणाऱ्या रोहितचं कौतुक करा, पण शमीला विसरू नका

>> गणेश पुराणिक

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात हॅमिल्टनच्या मैदानावर बुधवारी रोमहर्षक सामना रंगला. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या लढतीत टीम इंडियाने विजय मिळवत मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना अर्धशतक ठोकणाऱ्या रोहितने सुपर ओव्हरमध्ये सलग दोन चेंडूवर दोन षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’चा पुरस्कारही मिळाला. परंतु रोहितचे कौतुक करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची कामगिरी मात्र विसरू नका.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 179 धावा करत न्यूझीलंडपुढे विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य ठेवले. सुरुवातीचे गडी झटपट गमावल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने अखेरच्या षटकापर्यंत सामना खेचला. विलियम्सनने 95 धावांची खेळी केली. मात्र अखेरच्या षटकामध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असताना न्यूझीलंडचा संघ फक्त 10 करू शकला आणि सामना टाय झाला. अखेर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे झाला.

‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद

सुपर ओव्हरमध्ये विलियम्सन आणि गप्टीलने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर 17 धावा वसूल करत टीम इंडियापुढे 18 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून लोकेश राहुल आणि हिटमॅन रोहित शर्मा उतरला. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूत 8 धावा निघाल्या. अखेरच्या दोन चेंडूवर 10 धावांची आवश्यकता असताना रोहित शर्माने सलग दोन षटकार ठोकले आणि टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयानंतर रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रोहित हा कौतुकास पात्र आहे, मात्र शमीचाही टीम इंडियाच्या विजयामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.

चार चेंडूत केला दोन धावांचा बचाव
टीम इंडियाने 180 धावांचे लक्ष्य दिल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने 19 व्या षटकापर्यंत 171 धावा केल्या होत्या. त्यावेळी मैदानात विस्फोटक फलंदाज रॉस टेलर आणि सेट झालेला केन विलियम्सन होता. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला 9 धावा हव्या होत्या. विराटने चेंडू शमीच्या हातात ठेवला आणि त्याने कमाल करून दाखवली. 20 व्या षटकात पहिल्या चेंडूवर रॉस टेलरने षटकार ठोकला. त्यामुळे आता न्यूझीलंडला 5 चेंडूत 3 धावांची आवश्यकता होती. पुढच्या चेंडूवर टेलरने एक धाव काढली आणि स्ट्राईक विलियम्सनकडे आली. त्यावेळी शेवटच्या 4 चेंडूत 2 धावांची आवश्यकता होती. तिसऱ्या चेंडूवर शमीने 95 धावांवर खेळणाऱ्या विलियम्सनला राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. शेवटच्या दोन चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना शमीने एकच धाव देत टेलर बाद केले आणि सामना टाय केला. शमीने अखेरच्या चार चेंडूत दोन धावांचा बचाव करताना संघाला पुनरागमन करून दिले आणि पुढे टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये सामन्यासह मालिका खिशात घातली.

#INDvsNZ – टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, मालिकाही जिंकली

आपली प्रतिक्रिया द्या