
अफगाणिस्तानविरुद्ध अजेय असलेल्या हिंदुस्थानने पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यातही विजयाची परंपरा राखत नॉनस्टॉप पाचवा विजय नोंदविला. हिंदुस्थानने पाहुण्या संघाचा 6 विकेट्स आणि 15 चेंडू राखून सहज पराभव केला. या विजयासह हिंदुस्थानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून 40 चेंडूंत 60 धावा ठोकणारा शिवम दुबे या विजयाचा शिल्पकार ठरला. क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात अफगाणिस्तानला हिंदुस्थानला अद्यापि हरविता आलेले नाही.
अफगाणिस्तानकडून मिळालेले 159 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 17.3 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्मा दुसऱयाच चेंडूवर दुर्दैवीरीत्या धावबाद झाल्याने हिंदुस्थानचा धक्का बसला होता. रोहित बाद झाल्यानंतरही शुबमन गिल (23) व तिलक वर्मा (26) यांनी छोटेखानी पण देखण्या खेळी केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर शिवम दुबेने (नाबाद 60) जितेश शर्मा (31) व रिंकू सिंग (नाबाद 16) यांना हाताशी धरून हिंदुस्थानचा विजय साकारला. दुबेने 40 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह आपली नाबाद खेळी सजविली. जितेश शर्माने 20 चेंडूंत 5 चौकार ठोकले, तर रिंकू 9 चेंडूंत 2 चौकारांसह 16 धावांवर नाबाद राहिला.
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने मोहम्मद नबी (43) आणि अझमतुल्लाह ओमरझाईच्या (29) दमदार फलंदाजीमुळे 5 बाद 158 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली होती. रहमानुल्लाह गुरबाझ (23) व कर्णधार इब्राहिम जदरान (25) यांनी 8 षटकांत अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर नबी, ओमरझाई, झदरान यांनी संघाला दीडशे पलीकडे नेले. हिंदुस्थानकडून अक्षर पटेल व मुकेश कुमार यांनी 2-2 फलंदाज बाद केले.
























































