
क्वीन्सलॅण्ड सरकारच्या कोरोनासंबंधितच्या कडक नियमांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्राद्वारे टीम इंडियाच्या खेळाडूंना या कसोटीसाठी सूट देण्यात यावी, अशी मागणी केली होती. पण यानंतर 24 तासांच्या आतच ब्रिस्बेनमध्ये तीन दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यात 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे सुरू होणाऱया चौथ्या कसोटीच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
चौथ्या कसोटीदरम्यान 36 हजार क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पुढाकार घेण्यात आला होता. पण आता ब्रिस्बेनमध्ये कोरोनाबाधित वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आता इतक्या मोठय़ा प्रमाणात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात येणार नाही.
सिडनीलाच होऊ शकते चौथी कसोटी
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनलाच खेळवण्यात यावा यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया ठाम असले तरी सध्याची परिस्थिती पाहता दोन देशांमधील ही कसोटी तिथे होण्याची शक्यता फार कमीच दिसत आहे. या वेळी एक पर्याय ऑस्ट्रेलियासमोर आहे. दोन देशांमधील चौथी कसोटी ही सिडनीलाच खेळवण्यात येऊ शकते. सध्या सिडनी येथे तिसरी कसोटी खेळवण्यात येत आहे. तीन कसोटी सामन्यांनंतर ही मालिका रद्दही करण्यात येऊ शकते.
बीसीसीआय खेळाडूंच्या पाठीशी – गावसकर
क्वीन्सलॅण्ड सरकारला आपल्या जनतेची काळजी आहे. तशीच काळजी बीसीसीआयला आपल्या संघातील खेळाडूंची आहे, असे स्पष्ट मत हिंदुस्थानचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांनी या वेळी व्यक्त केले. बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे योग्य ती मागणी केली आहे. आता ज्याप्रमाणे खेळाडूंना सूट देण्यात आली आहे, तीच सूट यापुढेही द्यायला हवी, असे सुनील गावसकरांचे म्हणणे आहे.
कडक नियम पाळावेच लागतील!
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयच्या पत्राला उत्तर देताना म्हटले की, हिंदुस्थानच्या खेळाडूंना कोरोनासंबंधितचे कडक नियम पाळावेच लागणार आहेत. त्यांना फक्त सराव करण्यासाठी आणि खेळण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. बाकीच्या प्रसंगी त्यांना हॉटेलमध्येच रहावे लागणार आहे.
























































