क्रीडाप्रेमींसाठी मोठी बातमी, बुमराह चौथी कसोटी खेळण्याची शक्यता

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना शुक्रवार 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या कसोटीसाठी 11 फिट खेळाडूंची निवड करण्याचे आव्हान हिंदुस्थानपुढे आहे. हनुमा विहारी, रवींद्र जाडेजा याआधीच संघातून बाहेर फेकले गेले आहेत. तसेच हुकुमी एक्का असणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील दुखापत झाली आणि तो देखील निर्णायक सामना खेळणार नाही अशी माहिती समोर आली.

आता हिंदुस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी केलेल्या विधानामुळे बुमराह चौथ्या कसोटीत मैदानावर उतरण्याची शक्यता वाढली आहे. विक्रम राठोड म्हणाले की, ‘बुमराहच्या तब्येतीवर वैद्यकीय पथक नजर ठेऊन आहे. त्याच्या खेळण्यावर उद्या (शुक्रवारी) सकाळी निर्णय घेतला जाईल. बुमराह खेळण्यासाठी फिट आहे अथवा नाही हे पाहिले जाईल. जर तो फिट असेल तर तो नक्कीच चौथ्या कसोटीत मैदानात उतरेन.’

खेळाडूंच्या दुखापतींवर वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहे. त्यांना सावरण्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा. तसेच चौथ्या कसोटीसाठी कोणत्या अंतिम 11 खेळाडूंची निवड केली जाईल हे उद्या सकाळीच कळेल, असेही विक्रम राठोड म्हणाले.

दरम्यान, सिडनी कसोटीमध्ये क्षेत्ररक्षण करताना बुमराहच्या पोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो चौथ्या कसोटीत खेळणार नाही अशी माहिती समोर आली. मात्र आता वैद्यकीय पथक त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन असून फिटनेस टेस्टमध्ये तो पास झाल्यास चौथ्या कसोटीत खेळताना दिसेल.

बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतीत 3 सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले असून यात त्याने 29.36 च्या सरासरीने 112 बळी घेतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या