
हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भक्कम आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे. सलामीला आलेल्या केएल राहुल आणि मधल्या फळीतील ऋषभ पंतने शतके झळकावत टीम इंडियाला 250 पार नेलं आहे.
टीम इंडियाने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा संपूर्ण संघ 465 धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे टीम इंडियाकडे 6 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावातील शतकवील यशस्वी जैसवाल (4) स्वस्तात माघारी परतला. परंतु केएल राहुलने एका बाजूने खिंड लढवत नाबाद 113 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात शुन्यावर बाद झालेला साई सुदर्शन दुसऱ्या डावात 30 धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार गिलही (8) माघारी परतला. परंतु त्यानंतर फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपली धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवत 14 चौकार आणि 3 षटकरांच्या मदतीने 111 धावा चोपून काढल्या. सध्या टीम इंडियाने 286 धावांची आघाडी घेतली असून केएल राहुल आणि ऋषभ पंत फलंदाजी करत आहेत.