धावांच्या एव्हरेस्टनंतर हिंदुस्थानचे मिशन फॉलोऑन,गिलच्या विक्रमी द्विशतकामुळे हिंदुस्थान 587; इंग्लंड 510 धावांच्या पिछाडीवर

शुभमन गिलने एजबॅस्टनवर आज अक्षरशः रनोत्सव साजरा केला. इंग्लंड भूमीवरील सर्वोच्च खेळी करण्याचा पराक्रम स्वतःच्या नावावर करताना त्याने परदेशात कर्णधार म्हणून सर्वोच्च धावांचा विक्रमही रचला. त्याने 269 धावांची पराक्रमी खेळी करताना अनेक विक्रमांना मोडीत काढत दुसऱ्या कसोटीत हिंदुस्थानला 587 धावांचा एव्हरेस्ट उभारून दिला. त्यानंतर इंग्लंडची 3 बाद 77 अशी अवस्था करत त्यांना फॉलोऑनच्या दहशतीखाली आणले आहे. इंग्लंडवर फॉलोऑन लादण्यासाठी त्यांचा पहिला डाव 387 धावांच्या आत गुंडाळण्याचे हिंदुस्थानचे मिशन राहील. मालिकेत 1-1 बरोबरी साधण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानने आज पहिले पाऊल टाकले असून उद्या दुसरे दमदार पाऊल टाकण्याची जबाबदारी हिंदुस्थानच्या गोलंदाजांवर असेल.

हिंदुस्थानच्या 587 धावांनंतर इंग्लंडचे फलंदाज आपला बॅझबॉल खेळायला उतरले, पण आकाशदीपने आपल्या दुसऱ्याच षटकांत सलग चेंडूंवर लीड्सचा सामनावीर बेन डकेट (0) आणि ओली पोप (0) यांची विकेट काढत खळबळ माजवली. मग झॅक क्रॉलीची झकास विकेट सिराजने काढत इंग्लंडची 3 बाद 25 अशी बिकट स्थिती केली, पण त्यानंतर जो रुट (18) आणि हॅरी ब्रुकने (30) अर्धशतकी भागी रचत संघाला सावरले. खेळ थांबला तेव्हा इंग्लंड 3 बाद 77 अशा स्थितीत होता आणि 510 धावांच्या पिछाडीवर. कसोटीच्या तिसऱया दिवशी फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी त्यांना अजून 310 धावा कराव्या लागणार आहेत.

शेवटच्या 5 विकेटने केल्या 376 धावा

कालच्या 5 बाद 310 या धावसंख्येत गिलच्या विक्रमी खेळीमुळे आणखी 277 धावांची भर घातली गेली. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात शेवटचे 7 फलंदाज अवघ्या 41 धावांत कोसळले होते तर दुसऱया डावात 31 धावांत 6 फलंदाज बाद झाल्यामुळे हिंदुस्थानची दोन्ही डावांत घसरगुंडी उडाली होती. हीच घसरगुंडी हिंदुस्थानच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरली होती. मात्र आज गिलने ते अपयश पुसून टाकले. गिलने आपली खणखणीत खेळी साकारताना अनेक विक्रमांला आलिंगन घातले. हिंदुस्थानच्या शेवटच्या पाच फलंदाजांनी 376 धावांची विक्रमी भर घातली आणि हिंदुस्थानला 587 धावांचा एव्हरेस्ट उभारून दिला.

आज एकीकडे गिल विक्रमांचे इमले रचत असताना त्याच्या खांद्याला खांदा लावून खेळणारा रवींद्र जाडेजा दुर्दैवी ठरला. त्याचे शतकही जैसवालप्रमाणे हुकले. टंगने त्याची खेळी 89 धावांवर संपवली. त्यानंतर गिलने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत 414 वरून हिंदुस्थानची मजल सहाशेसमीप नेली.

विक्रमादित्य कर्णधार गिल

269 कर्णधार आणि म्हणून इंग्लंड भूमीवरील आणि आशिया खंडाबाहेरील सर्वोच्च वैयक्तिक खेळी. गावसकरांच्या इंग्लंडमधील 221 धावा आणि कोहलीच्या कर्णधार म्हणून सर्वोच्च 254 धावांच्या खेळीला मागे टाकले. तसेच ही खेळी परदेशातील तिसरी सर्वोच्च खेळी ठरली. वीरेंद्र सेहवागने (309) मुल्तान कसोटीत तर राहुल द्रविड (27) रावळपिंडी कसोटीत त्यापेक्षा मोठया खेळ्या केल्या आहेत. इंग्लंडमधील ही तिसरी द्विशतकी खेळी. याआधी सुनील गावसकर (221) यांनी 1979 साली तर राहुल द्रविडने (217) 2002 साली द्विशतक साकारले होते. ही दोन्ही द्विशतके ओव्हलवर केली होती. 5 कसोटी आणि वन डे या दोन्ही फॉरमॅटमध्ये द्विशतकी खेळी ठोकणार्या सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि ख्रिस गेल यांच्या यादीत गिलच्या नावाचाही समावेश झाला आहे.

गिल-जाडेजाची द्विशतकी भागी

गेल्या कसोटीत जाडेजा दोन्ही डावात अपयशी ठरला होता. मात्र आज जाडेजा गिलसोबत उभा राहिला. त्याने आपले अष्टपैलूत्व सिद्ध करताना गिलच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 203 धावांची भागी केली. आज पहिल्या सत्रात जाडेजा जास्त आक्रमक खेळला. त्यामुळे हिंदुस्थानने 109 धावा चोपून काढल्या. उपाहाराला दहा मिनिटे शिल्लक असताना जाडेजाने शतक 11 धावांनी हुकले. मात्र त्यानंतर गिलला वॉशिंग्टन सुंदरची सुरेख साथ लाभली. या जोडीनेही सातव्या विकेटसाठी 144 धावा जोडल्या. ही भागी रचताना गिलने 311 व्या चेंडूवर आपले कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक फलकावर लावले. हे क्षण साजरे केल्यानंतर तो इंग्लिश गोलंदाजांवर अक्षरशा तुटून पडला आणि त्याने पुढील अर्धशतक 37 चेंडूंतच साकारले. त्याचा सुस्साट खेळ पाहाता तो हिंदुस्थानचा तिसरा त्रिशतकवीर ठरला, असे स्पष्ट जाणवत होते. चहापानाला खेळ थांबला तेव्हा तो 265 धावांवर उभा होता. पण चहापान हिंदुस्थानी संघाला मानवला नाही. गिलने एक चौकार ठोकला, पण तो तिसऱया षटकांतच बाद झाला. त्याची 269 धावांची खेळी 509 मिनिटांनंतर थांबली. यात त्याने 30 चौकार आणि 3 षटकार खेचले. गिलनंतर हिंदुस्थानचा डाव संपवायला शोएब बशीरला फार वेळ लागला नाही.