IND VS ENG TEST : कोहलीपुढे मालिका बरोबरीचे ‘विराट’ आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । साऊथहॅप्टन

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात उद्यापासून (30 ऑगस्ट) चौथी कसोटी सुरू होणार आहे. पहिल्या दोन कसोटीत सपाटून मार खाल्ल्यानंतर तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. विजयाची हिच लय कायम राखण्याचे आव्हान विराट अँड कंपनीपुढे असणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना 31 धावांनी आणि दुसरा सामना एक डाव व 159 धावांनी गमावला. त्यानंतर तिसरा सामना 203 धावांनी जिंकून मालिकेत पुनरागमन केले.

साऊथहॅप्टनच्या मैदानावर आतापर्यंत फक्त तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर 266 धावांनी विजय मिळवला होता. है मैदान वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असल्याचे मानले जाते. हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन कसोटीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या 46 विकेट घेतल्या असून यातील 38 विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीत देखील इंग्लंडची आघाडीची फळी कापून काढण्याची जबाबदारी शमी, शर्मा, बुमराह, यादव या वेगवान गोलंदाजांवर असणार आहे.

पृथ्वीचे पदार्पण?
चौथ्या आणि पाचव्या कसोटीसाठी हिंदुस्थानच्या संघात मुंबईकर पृथ्वी शॉ याची निवड करण्यात आली आहे. सलामीवर मुरली विजय याच्या जागी पृथ्वीला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साऊथहॅप्टनमध्ये पृथ्वीचे कसोटीत पदार्पण होण्याची शक्यता आहे. पृथ्वीने प्रथमश्रेणीच्या 14 सामन्यात 7 शतक आणि 5 अर्धशतकांच्या जोरावर 1418 धावा चोपल्या आहेत.

दोन्ही संघांना दुखापतीचे ग्रहण
चौथा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झाले आहेत. हिंदुस्थानचा आघाडीची फिरकीपटू आर. अश्विन दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या खेळण्यावर प्रश्चचिन्ह आहे. अश्विनच्या जागी जाडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इंग्लंडचा भरवशाचा खेळाडू जॉनी बेअरस्टो हा देखील जायबंदी झाला आहे. स्टोक्सच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याने पट्टी बांधून अभ्यास केला. त्यामुळे इंग्लंडने बेअरस्टोला पर्याय म्हणून जेम्स विंसकडे पाहिले जात आहे.