जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हिंदुस्थानी संघाला हवाय विजय किंवा ड्रॉ

पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कोणता संघ पोहोचणार याचे उत्तर पुढील पाच दिवसांमध्ये मिळणार आहे. या वर्षी जून महिन्यात लॉर्डस् येथे होणाऱया फायनलमध्ये केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने सर्वप्रथम प्रवेश केलाय. फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ अहमदाबादमध्ये ठरणार आहे.

हिंदुस्थान – इंग्लंड यांच्यामध्ये आजपासून चौथ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला या कसोटीत किमान ड्रॉची गरज आहे. चौथ्या कसोटीत विजय मिळवल्यास हिंदुस्थानी संघ ही मालिका 3-1 अशा फरकाने खिशात टाकेल आणि अगदी रुबाबात अंतिम फेरीत पोहचेल. पण टीम इंडियाचा चौथ्या कसोटीत पराभव झाल्यास इंग्लंड ही कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत राखेल आणि ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहचेल.

दोन ‘यादव’ अंतिम अकरामध्ये

जसप्रीत बुमराहऐवजी उमेश यादव या वेगवान गोलंदाजाला हिंदुस्थानी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. उमेश यादव पाटा खेळपट्टीवरही आपल्या वेगाने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकतो. यावेळी युवा मोहम्मद सिराजलाही मागील कामगिरीच्या आधारावर संघात स्थान देण्यात येऊ शकते. अन्यथा अष्टपैलू हार्दिक पांडय़ाला संघात स्थान देऊन हिंदुस्थानी संघ आपली फलंदाजी ताकदही वाढवू शकते. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसवून कुलदीप यादवलाही अंतिम अकरामध्ये चान्स देण्यात येऊ शकतो.

वॉशिंग्टन सुंदरचे काय होणार…

कोणताही संघ मागील लढतीत विजय मिळवल्यानंतर पुढील लढतीसाठी शक्यतो बदल करीत नाही. पण जसप्रीत बुमराहने माघार घेतल्यामुळे टीम इंडियाला बदल करावा लागणार आहे. वॉशिंग्टन सुंदरचा मागील कसोटीत गोलंदाज म्हणून जास्त वापर झालेला नाही. त्यामुळे त्याचेही संघातील स्थान पक्के नाहीए.

फलंदाजांना खेळ उंचवावा लागणार

पहिल्या तीन कसोटींच्या खेळाकडे बघितल्यानंतर एक बाब प्रकर्षाने दिसून येईल ती म्हणजे दोन्ही संघांतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात आलेले अपयश. रोहित शर्मा वगळता हिंदुस्थानच्या इतर फलंदाजांना म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार विराट कोहलीने दोन अर्धशतके तर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व शुभमन गिल यांनी प्रत्येकी एक महत्त्वपूर्ण खेळी केलीय. उलट रविचंद्रन अश्विनने दमदार शतक झळकावत गोलंदाजीसह फलंदाजीतही ठसा उमटवलाय. इंग्लंडकडून कर्णधार जो रूट वगळता एकालाही हिंदुस्थानी गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला करता आलेला नाही. त्यामुळे चौथ्या कसोटीत दोन्ही संघांतील फलंदाजांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

… तर ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट होणार

ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकन दौऱयावर न जाण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने या प्रकरणावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आयसीसीकडे तक्रार केली. या आठवडय़ाच्या अखेरीसपर्यंत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर आयसीसीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पॅनेलची निवड करण्यात येणार आहे. या पॅनेलने दौऱयावर न जाण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दोषी ठरवल्यास दक्षिण आफ्रिकेला पूर्ण गुण दिले जातील. अशा परिस्थितीत इंग्लंडने चौथ्या कसोटीत हिंदुस्थानला पराभूत केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचता येणार नाही.

आजपासून चौथी कसोटी

हिंदुस्थान – इंग्लंड

अहमदाबाद

सकाळी 9.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या