
यशस्वी जैसवाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या शतकांनी उभारलेली धावसंख्या आणि त्यानंतर जसप्रीत बुमराच्या अचूक गोलंदाजीने हिंदुस्थानला मोठय़ा आघाडीच्या उंबरठय़ावर नेले, मात्र गचाळ क्षेत्ररक्षणामुळे हिंदुस्थानच्या हातातून चक्क सहा झेलही निसटले अन् मोठी आघाडीही गमावली. इंग्लंडच्या फलंदाजांनी हिंदुस्थानच्या गोलंदाजांना खणखणीत प्रत्युत्तर दिल्यामुळे पहिल्या कसोटीचे पहिले दोन्ही डाव अक्षरशः बरोबरीत सुटले. दोन्ही संघांनी एकाच ट्रकवर एकाच वेगाने धाव घेतल्यामुळे पहिल्या तीन दिवसांत बरोबरीचा खेळ पाहायला मिळाला.
पाहुण्यांच्या 471 धावांना इंग्लंडने 465 असे चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे हिंदुस्थानला 6 धावांची नाममात्र आघाडी मिळवता आली. क्षेत्ररक्षकांनी सहा झेल सोडल्यामुळेच हिंदुस्थानला 6 धावांची आघाडी मिळवता आली, अन्यथा ही आघाडी फार मोठी असती. तिसऱ्या दिवसाअखेर हिंदुस्थानने 2 विकेट गमावत 90 धावा केल्या असून आघाडी 96 धावांवर पोहोचली आहे. खेळ थांबला तेव्हा राहुल 47 तर गिल 6 धावांवर खेळत होता.
हिंदुस्थानच्या सिराज आणि प्रसिध कृष्णाला पह्डून काढणाऱ्या इंग्लंडच्या पाच फलंदाजांना एकटय़ा जसप्रीत बुमराने बाद केले आणि इंग्लंडच्या भूमीत तिसऱ्यांदा विकेटचे पंचक साजरे केले. इंग्लंडकडून ओली पोपने शनिवारी शतक झळकवले, तर हॅरी ब्रुकचे नववे शतक अवघ्या एका धावेने हुकले.
इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या 3 बाद 209 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. शतकवीर ओली पोप शनिवारच्या शंभर धावांत 6 धावांची भर घालून 106 धावांवर बाद झाला. प्रसिध कृष्णाने त्याला यष्टीमागे पंतकरवी झेलबाद केले. मग हॅरी ब्रुक व कर्णधार बेन स्टोक्स यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मोहम्मद सिराजने स्टोक्सला (20) यष्टीमागे पंतकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला बहुमोल यश मिळवून दिले. त्यानंतर ब्रुक आणि आलेला जेमी स्मिथ (40) यांनी सहाव्या विकेटसाठी 73 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली; मात्र प्रसिध कृष्णाने या दोघांना ठरावीक अंतराने बाद करीत इंग्लंडच्या फलंदाजीला लगाम घालण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. स्मिथने 52 चेंडूंत 40 धावा करताना 5 चौकार व एक षटकार लगावला. अवघ्या एका धावेने शतक हुकलेल्या हॅरी ब्रुकने 112 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार ठोकले. 26 वी कसोटी खेळत असलेल्या ब्रुकला आपले नववे शतक झळकवण्याची सुवर्णसंधी होती, त्याला हिंदुस्थानी क्षेत्ररक्षकांनी झेल सोडून जीवदानही दिले. तरीही ब्रुकचे शतक अवघ्या एका धावेने हुकले.
शेपटाने तंगवले
इंग्लंडने धावफलकावर 350 धावा लावण्यापूर्वीच 6 फलंदाज गमावले होते. त्यामुळे हिंदुस्थानला पहिल्या डावात समाधानकारक आघाडी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, हिंदुस्थानी क्षेत्ररक्षकांचे झेलफेल आणि मग ख्रिस वोक्स (38), ब्रायडन कार्स (22) व जोश टंग (11) या शेपटाच्या फलंदाजांनी हिंदुस्थानला चांगलेच तंगवले. ब्रुकनेही जीवदानाचा लाभ उठवत 99 धावांच्या खेळीने संघाला चारशेसमीप नेले. मग तळंदाजांनी आपली भूमिका चोख बजावत संघाला 465 पर्यंत नेले.
हिंदुस्थानचा झेल सोडण्याचा पराक्रम
इंग्लंडच्या डावाला लवकर गुंडाळून चांगली आघाडी घेण्याची संधी हिंदुस्थानच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे हुकली. यशस्वी
जैसवालने स्लिप आणि गलीमध्ये झेल सोडण्याचा सपाटा लावताना बुमराच्या गोलंदाजीवर चक्क तीन झेल सोडले. जे जैसवालने केले त्याचाच कित्ता हिंदुस्थानच्या अन्य तिघांनीही गिरवला. इंग्लंडचे सहा झेल सोडल्यामुळे हिंदुस्थानला किमान दीडशे धावांची आघाडीही गमवावी लागली.
बुमराने साधली कपिलची बरोबरी
बुमराने अर्धा संघ गुंडाळत तिसऱ्यांदा इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. तसेच परदेशात 12व्यांदा एका डावात पाच विकेट टिपत कपिल देव यांच्या परदेशातील विक्रमाचीही बरोबरी साधली. बुमराने आपल्या 46 व्या कसोटीत 14 व्यांदा डावात पाचपेक्षा अधिक विकेट टिपले आहेत. आता तो आशिया खंडाबाहेरील देशांत सर्वाधिक विकेट टिपणारा गोलंदाजही ठरलाय.