
मुंबई सत्र न्यायालयातील काही न्यायालये स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाविरोधात सेशन कोर्ट बार असोसिएशनने शुक्रवारी सलग दुसऱया दिवशी साखळी उपोषण सुरु ठेवले. वरिष्ठ पातळीवरून न्यायालये स्थलांतराचा प्रस्ताव मागे घेण्याबाबत अद्याप कुठलेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही 2 जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा असोसिएशनतर्फे अध्यक्ष रवी जाधव यांनी दिला.
फोर्ट येथील दिवाणी व सत्र न्यायालयाच्या इमारतीतील आठ न्यायालये माझगावच्या नवीन न्यायालय इमारतीत हलवण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला तीव्र विरोध करीत बार असोसिएशनने गुरुवारपासून साखळी उपोषणाची सुरुवात केली. शुक्रवारी सलग दुसऱया दिवशी आंदोलन सुरू ठेवल्यानंतरही वकिलांच्या मागण्यांबाबत वरिष्ठ न्यायालय प्रशासनाकडून कुठलेही ठोस लेखी आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे वकिलांनी आंदोलन तीव्र करण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. 2 जानेवारीपासून सुरू करणाऱया बेमुदत उपोषणामध्ये दरदिवशी साधारण 500 वकील सहभागी होतील, असे असोसिएशनचे अध्यक्ष रवी जाधव यांनी सांगितले.
























































