
देशातील कोरोनाची दहशत संपण्याच्या मार्गावर आहे. गुरुवारपर्यंत महामारीतून तब्बल 20 लाख 96 हजार 664 रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यामुळे रिकव्हरी रेट 73.91 टक्क्यांवर सुधारला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सध्या कोरोनाचे 6 लाख 86 हजार 395 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र यातील केवळ 0.28 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
देशवासीयांमधील कोरोना फैलावाची चिंता दूर करणारी आकडेवारी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली. त्यानुसार कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांपैकी केवळ 1.92 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये असून 2.62 टक्के लोक ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 28 लाख 36 हजार 926 वर गेली असली तरी यातील तब्बल 20 लाख 96 हजार 664 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. महामारीत एकूण 53,866 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
आणखी 58,794 लोक बरे; तर 69,652 नव्या रुग्णांची भर
देशात कोरोनामुक्तांचा आकडा नवनवा विक्रम नोंदवत आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 58,794 लोक कोरोनामुक्त झाले. दिवसभरात कोरोनाचे 69,652 नवे रुग्ण आढळले, तर 977 लोकांचा मृत्यू झाला. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून गुरुवारी तब्बल 9 लाखांहून अधिक नमुने तपासले.
– हिंदुस्थानला कोरोना लढय़ात यश येत असताना इतर देशांत विषाणूचा फैलाव कायम आहे. त्यामुळे जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2.22 कोटींच्या पुढे गेली असून 7 लाख 84 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.



























































