IND vs SL सिराजच्या तुफानी माऱ्यापुढे श्रीलंकेची दाणादाण, दहा गडी राखून टीम इंडियाचा विजय

आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजच्या तुफानी माऱ्यापुढे सपशेल लोटांगण घातलेल्या श्रीलंकेचा टीम इंडियाने दहा गडी राखून पराभव केला आहे. श्रीलंकेने टीम इंडियापुढे विजयासाठी अवघे 50 धावांचे आव्हान ठेवले होते. ते आव्हान टीम इंडियाच्या इशान किशन व शुभमन गिल या सलामीच्या जोडीने अवघ्या 6 षटकात पूर्ण करत टीम इंडियाला ही मालिका जिंकून दिली.

कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मोहम्मद सिराज नावाच्या वादळाने लंकेची दाणादाण उडवली. सिराजने या सामन्यात सहा विकेट्स घेऊन लंकेच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं आहे. विशेष म्हणजे यातल्या चार विकेट्स त्याने एकाच षटकात घेतल्या आहेत. त्यामुळे लंकेला अवघी 50 इतकीच धावसंख्या करता आली. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.

या सामन्याला सुरुवात झाली तेव्हा श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामना सुरू झाला आणि जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर पहिला बळी बाद केला. त्याने कुसल मेंडिसला भोपळाही न फोडता परत पाठवलं. त्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या तुफानी गोलंदाजीच्या बळावर एकाच षटकात चार बळी घेत लंकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने कुसल परेरा, समरविक्रमा, असलंका आणि डिसिल्वा यांना एकाच षटकात बाद केलं. श्रीलंकेला तेराव्या षटकात 40 धावांवर आठवा धक्का बसला. हार्दिक पांड्याने दुनिथ वेलाल्गेचा बळी मिळवला. 13 षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या आठ विकेट्सच्या मोबदल्यात 40 इतकीच होऊ शकली. त्यानंतर प्रमोद मदुशन आणि दुशान हेमंथा यांनी फलंदाजीची धुरा सांभाळली. मात्र, अवघ्या 50 धावांचं माफक लक्ष्य हिंदुस्थानसमोर ठेवून श्रीलंकेचा संघ ऑलआऊट झाला.