कोरोना लस आणखी एक वर्ष येणार नाही! ‘डब्ल्यूएचओ’ची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनावर पूर्णपणे सुरक्षित लस विकसित होण्यासाठी आणि सर्वत्र जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी 2021 च्या मध्यापर्यंत वेळ लागेल. म्हणजे सुमारे एक वर्ष कोरोनावरील लससाठी जनतेला वाट पाहावी लागणार आहे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गरेट हॅरिस यांनी जिनिव्हा येथे सांगितले आहे. लस विकसित करणे आणि त्याचे उत्पादन हे मोठे आव्हान असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अमेरिकेची घोषणा

अमेरिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी घोषणा करताना ऑक्टोबरअखेरपर्यंत कोरोना लस जनतेला मिळेल असे म्हटले आहे. यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचे निवडणूक राजकारण असल्याचे बोलले जाते. तीन नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. ट्रम्प यांना दुसऱयांदा निवडून यायचे आहे. त्यासाठी अमेरिकी जनतेला लस येणार ही भूलथापा असल्याचा आरोप होत आहे.

काय आहेत कारणे ?

  • लसीचा चाचणीचा तिसरा टप्पा अत्यंत महत्वाचा आणि मोठा असणार आहे. या चाचणीमध्ये लस किती प्रभावी आणि मानवासाठी किती सुरक्षित आहे हे स्पष्ट होईल. या चाचणीतील निष्कर्षाचा डाटा आरोग्य संघटनेशी शेअर केला पाहिजे.
  • आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये लसीने 50 टक्केही प्रभावी लेवल गाठलेली नाही.
  • आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेशी 76 देशांनी लससंदर्भात विचारणा केली आहे. डब्ल्यूएचओ आणि गावी या संस्थेच्या संयुक्त उपक्रमातून जगभरात लसीकरण मोहीम राबविली जाईल. गरीब देशांना फायदा होईल.अमेरिका या मोहिमेत सहभागी झालेली नाही. कोरोना लसीचे दोन अब्ज डोसचे लसीकरण 2021च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल.