
हिंदुस्थानात एकूण सक्रिय रुग्ण संख्या आज 1,64,511 वर पोहोचली आहे. हिंदुस्थानातील सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण भारताच्या एकूण बाधित रुग्णांच्या 1.48% इतके आहे.
मागील 24 तासात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये नवीन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 86.37% रुग्ण या 6 राज्यातील आहेत.
मागील 24 तासात 16,752 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वाधिक 8,623 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ केरळमध्ये 3,792 आणि पंजाबमध्ये 593 नवीन रुग्ण आढळले आहेत.
सक्रिय रुग्णसंख्या आणि नवीन कोविड बाधित रुग्णांमध्ये सतत वाढ होत असलेल्या राज्य आणि केंद्र शासितप्रदेशांसोबत केंद्र सरकार निरंतर संपर्क साधत आहे. कॅबिनेट सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीर या राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.



























































