पुणे – शिवरायांची तलवार इंग्लंडमधून परत आणण्याची मागणी, गहुंजे स्टेडियमवर शिवदुर्गची घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
कसोटी क्रिकेटमध्ये 15 हजार धावा करणारा एकमेव खेळाडू कोण आहे ते आम्हाला [email protected] वर नक्की कळवा

इंग्लंडमधील राणीच्या खासगी संग संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत हिंदुस्थानात आणावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवदुर्ग संवर्धन संघटनेच्या कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांनी गहुंजे येथील क्रिकेट मैदानात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गहुंजे येथील क्रिकेट मैदानात हिंदुस्तान आणि इंग्लंड यांच्यात 23 मार्च पासून एक दिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर आपल्या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे पाच कार्यकर्ते गहुंजे क्रिकेट मैदानात घुसले. हातात मागण्यांचे फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी भगवा ध्वज फडकवत घोषणाबाजी केली. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तळेगाव दाभाडे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

हर्षल अशोक सुर्वे (वय 42 वर्षे) विजय सुभाष दरवान (वय 47 वर्षे) प्रदीप पांडुरंग हांडे (वय 36 वर्षे) देवेंद्र नंदकुमार सावंत (वय 32 वर्षे) आणि आशिष चंद्रशेखर अष्टेकर (वय 31 वर्षे ) सर्व राहणार कोल्हापूर अशी गुन्हा दाखल केलेल्या पाच जणांची नावे आहेत. मैदानात बेकायदा घुसून घोषणाबाजी केल्याप्रकरणी तसेच साथीचा रोग अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यकर्त्यांकडे इनोव्हा मोटारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. या मैदानात हिंदुस्थान आणि इंग्लंड या संघांदरम्यान तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. 23 मार्च , 26 मार्च आणि 28 मार्च रोजी हे सामने खेळवण्यात येणार आहेत. इंग्लंडमधील राणीच्या खासगी संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आहे. ही तलवार परत हिंदुस्थानात आणावी या मागणीसाठी कोल्हापूरच्या शिवदुर्ग संवर्धन संघटनेचे वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे.