आखाती देशांत अडकलेल्या हिंदुस्थानींना दिलासा देणारी बातमी, विशेष विमानांनी मायदेशी परतणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका विमान सेवांना बसला आहे. या कठीण परिस्थितीत आखाती देशांमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानियांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी हिंदुस्थान सरकार आणि विविध विमान कंपन्यांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांत विशेष उड्डाणांच्या माध्यमातून अनेक हिंदुस्थानी नागरिक सुखरूप स्वदेशात परतले आहेत.

याच दरम्यान, एतिहाद एअरवेजने अबू धाबी ते हिंदुस्थानातील 8 प्रमुख शहरांसाठी आपली विमान सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 6 मार्च ते 19 मार्च या कालावधीत अहमदाबाद, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोची, कोझिकोड, मुंबई आणि कोलकाता या शहरांसाठी ही उड्डाणे चालवली जाणार आहेत. ज्या प्रवाशांचे आधीच बुकिंग झाले आहे, त्यांना या प्रवासात प्राधान्य दिले जाईल. प्रवाशांनी तिकीट बुकिंगसाठी एतिहादच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले असून, कन्फर्म तिकीट असल्याशिवाय विमानतळावर गर्दी करू नये, असा स्पष्ट सल्लाही कंपनीने दिला आहे. सर्व सुरक्षा निकषांची पूर्तता झाल्यानंतरच ही विमाने उड्डाण करतील.

दुसरीकडे, स्पाइसजेट कंपनीनेही 6 मार्चपासून संयुक्त अरब अमिरातीतून (यूएई) 14 विशेष उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फुजैराह येथून 13 आणि दुबई येथून एका उड्डाणाचा समावेश आहे. यातील नऊ उड्डाणे फुजैराह ते मुंबई आणि चार उड्डाणे फुजैराह ते दिल्ली या मार्गावर असतील. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत स्पाइसजेटने यूएईमधून दिल्ली, मुंबई आणि कोचीसाठी 25 विशेष विमाने चालवली आहेत. मात्र, परिस्थिती अद्यापही संवेदनशील असल्याने मुंबई विमानतळावरील 34 आगमन आणि 39 प्रस्थान करणारी उड्डाणे आज रद्द करण्यात आली आहेत.

मध्य पूर्वेतील अस्थिर परिस्थिती लक्षात घेता, इंडिगो एअरलाईन्सने आपल्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी तिकीट रद्द करण्यावरील शुल्काची सवलत आता 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या विमानाची ताजी स्थिती तपासून घ्यावी आणि मदतीसाठी कंपनीच्या ग्राहक संपर्क केंद्राशी संपर्क साधावा, असे इंडिगोने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.