
जूनमध्ये दडी मारून बसलेला पाऊस जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून सक्रिय झाला असून आतापर्यंत देशातील 20 राज्यांत चांगलाच बरसू लागला आहे. पर्वतरांगांनी वेढलेल्या हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्रासह राज्यांमध्ये काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून दरडी कोसळण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
जुलै महिन्यांत देशभरात पावसाने चांगली सुरुवात केली असली तरी काही राज्यांत झालेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे ढगफुटी, दरडी कोसळणे तसेच काही वेळा विजा कोसळल्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी हिमाचलधील कुलू आणि शिमला भागात ढगफुटी, महापूर आणि दरडी कोसळल्यामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला, तर पाच जण बेपत्ता झाले आहेत. राजस्थानमध्ये पावसाबरोबरच वीज कोसळल्यामुळे बुंदी भागात 2, बांरा विभागात 2 आणि भरतपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर अनेक जिह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कर्नाटक, मध्य प्रदेशलाही तडाखा
हिमाचलमधील कुलूमध्ये बियांस नदीत गाडी पडल्यामुळे तिघे जण वाहून गेले. तिघांपैकी चालकाला वाचवण्यात यश आले. उर्वरित दोघांचा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) शोध घेत असून आयटीबीपीच्या जवानांनी महापुराने वेढलेल्या पुरात शोधमोहीम राबवली. कर्नाटकमध्ये पंजकाल गावात दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने कर्नाटकच्या किनारपट्टीवरील भागाला पावसाचा रेड ऍलर्ट जारी केला असून शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. मध्य प्रदेशमधील भोपाळला सर्वात जास्त फटका बसला. इंदौर, उज्जैन, ग्वाल्हेर, चंबल या भागात मुसळधार पाऊस आणि वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला.





























































