भारताच्या सागरी सुरक्षेचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

परदेशांतून भारतात येणाऱ्या बोटींना योग्य सुरक्षा द्यावी लागेल. परदेशी बोटींवर काम करणाऱ्यांना गुप्त माहिती कशी काढायची, बोटीचे काही काळ रक्षण कसे करायचे याकरिता प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यांना मिळालेली माहिती कशी पुढे पाठवायची हेदेखील शिकवावे लागेल. कितीही बजेट वाढवले तरीही संरक्षण करणाऱ्या जहाजांची संख्या फार वाढणार नाही. म्हणजे सध्याच्या जहाजांचा योग्य वापर करूनच लाल समुद्र, अरेबियन समुद्र, किनारपट्टी आणि एक्सटेंड इकोनॉमिक झोन ही सुरक्षित करावी लागेल.

इस्रायल-गाझा संघर्षामध्ये इस्रायलच्या बाजूने आणि हमास- पॅलेस्टाईनच्या बाजूने काही देश व दहशतवादी संघटना खेचल्या गेल्या आहेत. हमासने इस्रायलविरोधात छुपे वा प्रकट हल्ले करण्यास सुरुवात केले आहेत. इस्रायलच्या उत्तरेकडे असलेल्या लेबनॉनस्थित हेझबोला संघटनेकडून हमासच्या समर्थनार्थ इस्रायलच्या विरोधात हल्ले केले जात आहेत. मात्र येमेनस्थित हुती दहशतवाद्यांकडून पूर्णपणे वेगळय़ा दिशेने हमासच्या समर्थनार्थ इस्रायलविरोधी हल्ले सुरू झाले आहेत. या हल्ल्यांचा रोख लाल समुद्रातील इस्रायली आणि इस्रायल मित्र देशांच्या व्यापारी जहाजांकडे आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून सुरू झालेले हे हल्ले होत आहेत.

7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर गाझा संघर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी लाल समुद्रात यूएसएस कार्नी अमेरिकी विनाशिकेवर चार क्षेपणास्त्रs डागली गेली आणि 15 ड्रोन हल्ले झाले. हुतींकडून आलेल्या या क्षेपणास्त्रांचा अमेरिकी विनाशिकेने सहज लक्ष्यभेद केला, पण सागरी व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सागरी महामार्गावर मालवाहू व्यापारी जहाजे आणि तेलवाहू जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला.

अमेरिका, मित्र देशांच्या नौदल नौका स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी सक्षम आहेत, परंतु व्यापारी जहाजे आणि मालवाहू टँकर मात्र अशा प्रकारची सुसज्ज सुरक्षा व्यवस्था बाळगू शकत नाहीत. लाल समुद्रातील व्यापारी वाहतूक महत्त्वाची आहे. कारण भूमध्य समुद्रातून सुएझ कालव्यामार्गे लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून अरबी समुद्र ते हिंदी महासागर असा हा विस्तीर्ण आणि व्यापारीदृष्टय़ा मोक्याचा जलमार्ग आहे.

हुती बंडखोरांना इराणचे शस्त्रास्त्र आणि संपत्तीच्या माध्यमातून पाठबळ आहे. सौदी अरेबियाविरुद्ध येमेनमध्ये वरचष्मा गाजवण्यासाठी इराणने हुतींना सुसज्ज केले. यातून सौदी अरेबियाचा पराभव झाला तरी हुती शिरजोर बनले. आता ते इराणचेही ऐकत नाहीत. इस्रायल आणि अमेरिका या शत्रूंविरोधात इस्रायली भूमीशिवाय लाल समुद्र, अरेबियन समुद्र, हिंदी महासागरात चाललेले ड्रोन व क्षेपणास्त्राचे हल्ले जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. याचा भारतालाही त्रास होत आहे. कारण भारताचा 20 टक्के व्यापार या समुद्रातून होतो. आता हुतींचे हल्ले अरबी समुद्रात म्हणजे भारताच्या सागरी सीमेवर होत आहेत. इस्रायलमध्ये नोंदणी झालेल्या एम. व्ही. चेम प्लुटो या रसायनवाहू जहाजावर गुजरातपासून 200 नॉटिकल मैलांवर हल्ला करण्यात आला. लाल समुद्रातून मोठय़ा प्रमाणात तेलाची वाहतूकही होते. आता तेलवाहू जहाज पंपन्यांनी वाहतुकीवर अतिरिक्त जोखीममूल्य आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर दोन ते पाच टक्क्यांनी वाढले आहेत. भारताला रशियाकडून तेलपुरवठा होतो आणि रशिया-इराण संबंध सुरळीत असल्यामुळे या तेलवाहू जहाजांना अद्याप हुतींनी लक्ष्य केलेले नाही. मात्र धान्य, रसायने, खनिजे, खते घेऊन येणाऱया जहाजांवर हल्ले होऊ शकतात.

लाल समुद्र टाळून दक्षिण आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’ भूशिराला वळसा घालून माल वाहतूक करणे अतिशय खर्चिक आहे. कारण किंमत 30-40 ’टक्के वाढते. तेव्हा इस्रायल-हमास संघर्ष थांबणे किंवा अमेरिकेची ‘ऑपरेशन प्रॉस्परिटी गार्डियन’ ही सागरी संरक्षण योजना तातडीने कार्यान्वित होणे गरजेचे आहे. येमेनच्या भूमीवर हुती तळ उद्ध्वस्त करून ही समस्या मुळापासून उखडून काढणे अमेरिकेच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे ठरेल. शिवाय आणखी एका मुस्लिम देशाविरुद्ध लष्करी कारवाई करणे अमेरिकेला राजकीयदृष्टय़ाही सोयीचे नाही. त्यामुळेच हमासपेक्षा हुतींची समस्या अधिक तापदायी ठरणार आहे.

लाल समुद्र हा पॅसिफिक व अटलांटिक या महासागरांच्या खालोखाल जगातील तिसऱया क्रमांकाचा मोठा महासागर आहे. या समुद्राच्या पूर्वेस अरबस्तानचे द्वीपकल्प आणि पश्चिमेस ईशान्य आफ्रिका असून एडनच्या आखाताने तो अरबी समुद्रास जोडलेला आहे. लाल समुद्राच्या प्रदेशात पर्जन्यमान अतिशय कमी आहे. या समुद्रास एकही नदी येऊन मिळत नाही, परंतु एडनच्या आखातातून सामुद्रधुनीमार्गे पाणी आत येते.

भारताच्या मर्चंट नेव्हीची संख्या मोठी आहे. भारताचा 95 टक्के व्यापार समुद्रीमार्गाने होतो. वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 1200 हून अधिक बोटी सागरी व्यापारात गुंतलेल्या आहेत. त्यापैकी 840 बोटी आपल्या समुद्रकिनाऱयावर व्यापार करण्यात व्यस्त असतात आणि किनारपट्टीवरून ये-जा करतात. जवळपास 400 बोटी या महासागरात इतर देशांशी व्यापारासाठी जात असतात. याचा अर्थ 1200 हून अधिक भारतीय बोटी व्यापारासाठी किनारपट्टीवरून विशेष आर्थिक परिक्षेत्रात जात असतात. मात्र भारताच्या व्यापारी जहाजांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे 80 ते 85 टक्के भारतीय व्यापार हा परदेशातील जहाजातून होतो. या जहाजांची सुरक्षासुद्धा आपल्याकरिता महत्त्वाची आहे.

याशिवाय अनेक भारतीय खलाशी इतर देशांच्या व्यापारी जहाजावर काम करतात. आताच्या आकडेवारीनुसार जगातील सगळय़ा मर्चंट नेव्हीमध्ये तैनात असलेल्या खलाशांच्या संख्येत 14 ते 16 टक्के योगदान हे भारतीय खलाशांचे आहे. भारतीय परदेशी बोटींवर करत असतील तर त्यांचीसुद्धा सुरक्षा भारताकरिता महत्त्वाची आहे.