
सामना ऑनलाईन | लंडन
यजमान इंग्लंड संघाला शनिवारी शतकवीर जो रूट पावला आणि त्यांनी दुसऱ्या वनडे लढतीत ५० षटकांत ७ बाद ३२२ अशी दमदार मजल मारली. इंग्लंडने पाहुण्या टीम इंडियापुढे विजयासाठी ३२३ धावांचे जबर आव्हान ठेवत मालिकेत पुनरागमनाचे संकेत दिले. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधार इयान मॉर्गनचा हा निर्णय योग्य ठरवत जेसन रॉय (४०) ,जॉनी बेयरस्टो (३८) यांच्या ६९ धावांच्या भागीदारीनंतर जो रूटने इंग्लंडच्या डावाची सूत्रे स्वीकारत संघाचा डाव सावरला. रूटने ११६ चेंडूंत नाबाद ११३ धावांची शतकी खेळी रचत इंग्लंडला ५० षटकांत ७ बाद ३२२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
शतकवीर रूट आज जबर फॉर्ममध्ये होता. त्याने कुलदीप यादवच्या फिरकीचा समर्थपणे सामना करीत ८ चौकार व १ षट्काराच्या सहाय्याने आपले नाबाद शतक झळकावले. रूटने कर्णधार मॉर्गनच्या ( ५१ चेंडूंत ५३) साथीने तिसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची शतकी भागीदारी रचली .त्यानंतर सातव्या विकेटसाठी डेविड व्हिली (५० ) सोबत ८३ धावांची मोठी भागीदारी रचत इंग्लंडला त्रिशतकी धावसंख्येपार नेले. हिंदुस्थानच्या वतीने फिरकीवीर कुलदीप यादवने ६८ धावा मोजत ३ फलंदाज बाद केले .



























































