
हिंदुस्थानचा संघ जसा ऑलिम्पिकमध्ये दारिद्रय़रेषेखाली आहे, त्यापेक्षा भीषण स्थिती फुटबॉल जगतात आहे. सुमारे 144 कोटी लोकसंख्या असलेला आणि जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न बाळगणारा हिंदुस्थानी संघ 2026 च्या ‘फिफा’ वर्ल्ड कपसाठीसुद्धा पात्र होऊ शकला नाहीये. विशेष म्हणजे, फिफा वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांची संख्या 32 वरून 48 करण्यात आली तरी हिंदुस्थानी संघाला पात्रता फेरीचे दिव्य गाठता आलेले नाही. ही हिंदुस्थानसाठी सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे. दुसरीकडे एक कोटी लोकसंख्या असलेला छोटासा जॉर्डन हा देशही आशिया खंडातून फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलाय. तसेच उझबेकिस्ताननेही फिफा वर्ल्ड कपच्या पात्रतेचे शिखर गाठलेय. हे छोटेसे दोन्ही देश प्रथमच फिफा वर्ल्ड कप खेळणार आहेत. संघांच्या वाढलेल्या संख्येचा फायदा या दोन्ही देशांनी उचललाय; पण इथेही हिंदुस्थानी फुटबॉल संघाने दीडशे कोटींच्या उंबरठय़ावर असलेल्या हिंदुस्थानी जनतेचा अपेक्षाभंग केलाय. घोर अपमान केलाय.
हिंदुस्थानचे शेकडो खेळाडू मोठय़ा थाटात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवतात, पण त्यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या खेळाडूंनाही पदकस्पर्श करता येत नाही. दोन आठवडे चालणाऱया या खेळांच्या पुंभमेळय़ात आम्ही बाबा हिंदुस्थानी आज जिंकतील, उद्या जिंकतील ही भाबडी आशा बाळगून असतो. पण ती भाबडी आशा नेहमीच क्षणभंगूर ठरते. फुटबॉलच्या बाबतीतही सारे सेम चाललेय. हिंदुस्थानचा संघ फिफा वर्ल्ड कपमध्ये पात्र ठरावा म्हणून अब्जावधी रुपयांची उलाढाल गेल्या दहा वर्षांत करण्यात आलीय. खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी परदेशी प्रशिक्षकही बोलावण्यात आलेत. स्टेडियमचा दर्जाच नव्हे, तर खेळाचा आणि सोयीसुविधांचा दर्जाही उंचावण्यात आलाय, पण आपल्या संघाच्या खेळाचा दर्जा मात्र तसाच आहे.
फुटबॉलच्या जागतिक क्रमवारीत 127 व्या क्रमांकावर असलेला हिंदुस्थान फिफा वर्ल्ड कपचे 48 संघ झाल्यामुळे आशियाच्या 8 संघांत स्थान मिळवेल, अशी साऱयांनाच आशा होती, पण ती आशा खोटी ठरली. आशियातून झालेल्या पात्रता फेरीच्या ‘अ’ गटात हिंदुस्थानला केवळ एकच विजय नोंदविता आला. तर या गटातून कतार आणि कुवेतने आपल्या पात्रता फेरी प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
थोडं हेसुद्धा वाचा!
– आशिया खंडातून पात्र ठरलेल्या जॉर्डन देशाची लोकसंख्या अवघी 1.14 कोटी आहे, तर उझबेकिस्तानची लोकसंख्या 3.57 कोटी आहे. मात्र 144 कोटी महाप्रचंड लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानला यंदाही फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याचे भाग्य लाभू शकले नाही.
– आशिया खंडातील 46 देश पात्रता फेरीत स्थान मिळवण्यासाठी झगडत असून त्यापैकी 8 देश फिफा वर्ल्ड कपमध्ये दिसतील. 2022 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये आशिया खंडातून यजमान कतारसह ऑस्ट्रेलिया, इराण, जपान, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया हे सहा संघ खेळले होते.
– 2026 च्या फिफा वर्ल्ड कपसाठी जपान, इराण, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया हे गतवेळचे चार संघ पुन्हा पात्र ठरले आहेत. तर जॉर्डन आणि उझबेकिस्तान हे दोन संघ प्रथमच वर्ल्ड कप खेळतील. उर्वरित दोन स्थान मिळवण्यासाठी कतार, सौदी अरेबिया, यूएई, इंडोनेशिया, इराक आणि ओमान या संघांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळेल.
– 2022 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये एकूण 32 संघ खेळले होते. त्यापैकी कोस्टारिका (51 लाख), उरुग्वे (34 लाख), क्रोएशिया (39 लाख), डेन्मार्क (60 लाख), सर्बिया (66 लाख), स्वित्झर्लंड (89 लाख) आणि वेल्स (31 लाख) या देशांची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी होती.
– 2022 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या सर्व 32 संघांची एकूण लोकसंख्या 161 कोटी इतकी झाली होती. तेव्हा हिंदुस्थानची लोकसंख्या 138 कोटी इतकी होती.
– कतार फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या तब्बल 12 संघांची लोकसंख्या ही मुंबईच्या लोकसंख्येपेक्षा कमी होती.
हिंदुस्थानसाठी फिफा वर्ल्ड कप दूरच
हिंदुस्थानचे जागतिक क्रमवारीतील 127 वे स्थान पाहता फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणे हिंदुस्थानसाठी पुढील 20 वर्षेही कठीण मानले जात आहे. आशियातील 46 देशांमध्येही हिंदुस्थानी संघाला टॉप 20 संघात स्थान मिळवता आलेले नाही. हिंदुस्थानला फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्यासाठी सर्वप्रथम अव्वल दहा संघांत स्थान मिळवण्याची किमया साधावी लागेल. सध्या आशियातील अव्वल दहा संघांची कामगिरी पाहाता हिंदुस्थानसाठी टॉप टेन स्थानही फार दूरच आहे.